Thursday, 27 November 2014

गुपित पोटांत ठेवणे !

                               गुपित पोटांत ठेवणे !   

 ‘हे तुझ्यात आणि माझ्यातच राहूदे' अशी काहीशी सुरवात असते. असेच काहीसे पुढे बोलले जाते ---मी तुलाच हे 'सिक्रेट' (गुपित) सांगत आहे. तू मात्र हे कोणालाच सांगू नकोस -- अगदी बायकोला देखील ---वगैरे, वगैरे! मग त्याला इंग्रजीतील 'blah, blah,--' ही पुस्ती जोडली जाते आणि सारे गुपित आपल्या कानांत कुजबुजले जाते. हे गुपित पोटांत ठेवणे फारच कठीण असते. कधी एकदा कोणाला सांगतो असे तुम्हाला वाटू लागते.

आणि असेच घडले त्या दिवशी. मला एक फोन आला. साऱ्या शिष्टाचार आणि सौजन्याच्या देवाण -घेवाणा नंतर पलीकडून ऐकू आले, " हे तुझ्यात आणि माझ्यातच राहूदे हं. कोणाला म्हणजे कोणालाच हे ठाऊक नाही. जेंव्हा मला ही गोष्ट मावशीबाईंनी सांगितली तेंव्हा, काय सांगू, मला मोठा धक्काच  बसला. तिने मला बजाऊन सांगितले --- कोणालाच हे सांगायचे नाही. तिने फक्त मलाच सांगितले आहे. विठ्याला (मावशीबाईंचा मुलगा) आणि त्याच्या बायकोला देखील हे माहित नाही," ती दबलेल्या, मृदू आणि अस्पष्ट स्वरात ते सारे 'सिक्रेट' माझ्या कानांत सांगू लागली. बहुदा मी एक चांगला 'listener' असल्या मुळेच ती मला अधून-मधून असे सिक्रेट्स फोन वर सांगत असते. 
  "जवळपास कोणी आहे कां ग ?"मी विचारले.
 " नाही. कां,रे?" 
"मग फोन  मध्ये मोठ्यांनी बोलकी. मला काही ऐकू येत नाही"
 " बरे" असे म्हणत तिने सारे गुपित माझ्या पुढे ठेऊन पुन्हा एकदा आपले मन मोकळे केले- पोटातील गुपित बाहेर काढून पोट हलके केले. तिने मला कमीत कमी दहा वेळा तरी सांगितले  असेल -  ‘हे तुझ्यात आणि माझ्यातच राहूदे' आणि 'मी कोणालाही हे सांगणार नाही' असे कमीत कमी दहा वेळा तरी माझ्या कडून वदवून घेतले असेल. 

' गुपित पोटांत ठेवणे' वरून मला मिडास राजाची आणि त्याच्या न्हाव्याची आठवण होते. चला आपण त्या गोष्टी कडेच वळूया. 

  ग्रीक पौराणिक कथेत अनेक देव आहेत. दैओनस हा द्राक्षांच्या पिकांचा, मदिरेचा, पारंपरिक आणि धार्मिक विधींचा आणि उत्पत्तीचा परमेश्वर. सिल्लेनस हे त्यांचे गुरु तसेच  पोशिंदा वडील (foster father). एकदा सिल्लेनिअस मद्य पिऊन नशेत धुंद झाले आणि घरा बाहेर पडले व हा हा म्हणता  ते बेपत्ता झाले. मिडासने  त्यांना शोधले, त्यांच्यावर उपचार करून दैओनस कडे सुपूर्त केले. दैओनसने मिडासला आपल्याला इच्छित असा वर मागण्यास सांगितले.
 "मी ज्याला स्पर्श करीन त्याचे सोने होईल!"  
" तथास्तु!" झाले! मिळाले वरदान. आणि हात लावताच झाड झाले सोन्याचे आणि दगडही झाले सोनेरी. मिडासचा आनंद मावेना गगनांत.! पण जेंव्हा खाण्याचे झाले सोन्यात रुपांतर आणि पाणी झाले सोनेरी बर्फ तेंव्हा  आपल्याला मिळालेला आशीर्वाद मानायचे की शाप समजायचे हे त्याला समजत नव्हते. मग स्वतःची मुलगी सोन्याची बाहुली बनली. त्याला पश्चाताप झाला आणि त्याने दैओनसकडे साकडे घालून उ:शाप मिळवला. 

                                                                             दैओनस


सारे पूर्ववत झाले. पण हा  मिडासच्या कहाणी अंत नव्हे. त्याला सोन्याचा आणि शान-शौकतीचाच तिटकारा येऊ लागला.  नंतर त्याने आपल्या विलासित जीवनाचा त्याग केला.  आता तो प्यान ह्या देवाची भक्ती करू लागला.
 प्यान हे निसर्ग,परीयावरण, धनगर, मेंढरं  आणि डोंगरांचा परमेश्वर. ते सुंदर 'पाईप' (वेळूची बासरी सारखे एक वाद्य ) वाजवित असत. त्यांना आपल्या ते वाद्य वाजवण्याच्या कौशल्याचा इतका गर्व होता की त्यांनी साक्षात अपोलो बरोबर पैज मारली. अपोलोंनी आव्हान स्वीकारले.


                                                         प्यान सोबत डफणीस

अपोलो हे तर देवांचे संगीत- तज्ञ गुरु आणि 'लाईर' ह्या वाद्याचा संशोधक. मग सुरु झाले दोघांत द्वंद्व.
                अपोलो                                           त्मोलोस

सर्व पर्वतांचा देव, त्मोलोस ह्यांच्या कडून नाय-निवडा होणार होता. कारण पर्वता सारखे दिर्घायु  आणि ज्ञानी दुसरे कोणी नव्हते. प्यानने आपले पाईप वाजवण्यास आरंभ केला, बासरीतून उमटणारे सूर इतके मधुर, सैराट पण मोहक होते की झाडावरील आणि आभाळातील सारे पक्षी जवळ येउन आनंदाने डोलू लागले, खारी आणि ससे बिळातून बाहेर येउन नाचू लागले, फॉन (fauns) हर्षाने ओरडू लागले कारण ते मधुर ध्वनी त्यांच्या रेशमी केसाळ कानांत गुदगुदल्या करीत होते.  एवढेच नाही तर आता झाडेही तालात डोलू लागली होती.


  फॉन हर्षाने ओरडू लागले
                  



मग अपोलो आपला सोन्याचा 'लाईर' डाव्या हातात घेत उभे राहिले आणि उजव्या हाताच्या बोटांनी लाईरची तार छेडली. आणि :





बाहेर पडणारे ते अनोखे स्वर कोणी प्राण्याने, मानवाने किंवा कोणत्याही देव-देवतांनी ऐकले नव्हते. ते स्वर कांनी पडताच सर्व जंगलातील सारे प्राणी पशु-पक्षी पाषाणा सारखे स्तब्ध झाले. झाडांनी आपली पाने देखील स्तब्ध केली. हवेने आपला प्रवाह रोखून धरला आणि पृथ्वी स्थिर झाली. जणू सारी सृष्टीच मंत्र मुग्ध झाली होती. 
  
त्मोलोस उद्गारले, " मी अपोलोला विजेता घोषित करतो! अपोलो निर्विवाद विजयी आहे!"
" हो ,हो!" सारे ओरडू लागले. केवळ एक सोडून बाकी साऱ्यांना निर्णय मान्य केला. मिडासला मात्र तो पटला नव्हता आणि त्यांनी आपले मत मांडले देखील. आक्षेप घेतला आणि तक्रारही केली. कदाचित हे सारे त्याच्या प्यान वरील भक्ती पोटी असावे. आपल्या कडे जशी म्हण आहे ' गाढवाला गुळाची चव काय?' तसल्याच धर्तीवर असलेल्या ग्रीक मध्ये प्रचलित  असलेला वाक्प्रचार वापरून अपोलो म्हणाले , " मिडास, जर तुला समजले नसेल की चांगले संगीत कोणाचे तर नक्कीच तुझे कान गाढवाचे असले पाहिजेत!"  
 आणि मिडासचे कान झाले गाढवाचे, आपले हे गुपित लापावाचे कसे? मग कान लपवण्यासाठी मिडास केस वाढवू लागला आणि डोक्याला मोठे फेटे बांधू लागला. जस जसे केस वाढू लागले तस तसे फेटा बांधणे कठीण होत गेले. आपल्या न्हाव्याला बजावून सांगितले, " माझ्या कानांन संबंधी कोणास तू सांगितलेस तर मी तुझी गय करणार नाही. कोणालाही समजले तरी मी तुलाच जबाबदार ठरवून कडक शिक्षा करेन."

पोटातील ह्या गुपितामुळे न्हाव्याचे पोट फुगू लागले. अगदी असाय झाले. शेवटी तो एका कुरणात (meadow) गेला व तेथे एक खडा खणून त्यात आपले तोंड घालून सारे गुपित अक्षरशः भडा भडा ओकून टाकले. पुढे त्या जमिनीवर वेळू  आणि झाडे वाढली. आणि ती सारे झाडे-झुडपे गुणगुणू लागले " मिडासचे कान गाढवाचे" आणि  तयार झाले  'Whispering Meadows'. एवढेच नाही तर त्या जंगलातील लाकडा पासून तयार केलेले  सर्व सारी वाद्य तेच बोल बोलू लागले. सारी वाद्य " मिडासचे कान गाढवाचे" ओरडू लागले - आपल्या  तबल्यातून देखील हेच बोल - " मिडासचे कान गाढवाचे" तुम्हाला ऐकू येतील. ह्या साऱ्यांची खापर फुटली ती बिचाऱ्या न्हाव्यावर. 

 दंतकथा म्हणा किंवा आख्यायिका  पण असे म्हंटले जाते की पिड्या मागून पिड्या निघून गेल्या पण पुढील सर्व राज्यांना (राज कर्त्यांना ) हा शाप लागू झाला. तसेच गुपित न ठेवण्याची खोड सर्व न्हाव्यानां  बसली. बिचारे न्हावी. वास्तविक हा माणसाचाच दोष किंवा गुणधर्म. अशीही दंतकथा आहे- जे न्हावी गुपित उघड करीत त्यांना फाशी दिली जाई. आणि तुम्हाला माहित आहे 'Issyk-Kul' तलाव कसा तयार झाला? - ती एक विहीर होती आणि एका न्हाव्याने त्या विहिरीत त्या वेळच्या राज्याच्या (राजा ओस्सोनेस ) गाढवाच्या कांनाचे रहस्य सांगितले. पण ती विहीर बंद करण्यास तो विसरला. विहिरीला पूर येऊन तयार झाला हा तलाव.
                                                          हाच तो इसिक - कुल तलाव

 तर 'गुपित पोटात न ठेवता येणे' ह्याला आपण 'न्हावी' परिणाम म्हणूया. बिचारा न्हावी. आपला सर्वांचा दोष आपण बिचाऱ्या न्हाव्यावर टाकतो. 

 'पोटातून गुपित खाली करण्यासाठी  आज केशकर्तनालय हे एकच साधन नव्हे. गुपित कोणाच्या कानांत गुपचूप पणे सांगण्याची गरज काय? फोन आहेत - आपण ते इमेल द्वारेही  पाठवू शकतो  आणि त्या पेक्षा उत्तम पद्धत - फेस बुक नव्हे का? हे सारे वाचकांकडून वाचून झाल्यावर एखादा तरी फोन न य़ेणे  म्हणजे नवल.

"हॅलो विनय, कोण ती बाई आणि तिने एवढे काय सिक्रेट सांगितले?"

" बरे, मी तुला सांगतो. पण हे तुझ्यात आणि माझ्यातच राहूदे--------हा हा हा!"

गुपित पोटात ठेवणे फारच कठीण, बरोबर?

                                                                                  विनय त्रिलोकेकर