Tuesday, 21 May 2019

'ब्रोकन विंडो' एक मोडलेली खिडकी!



'ब्रोकन विंडो' एक मोडलेली खिडकी! 
'ब्रोकन विंडो' म्हणजे मोडलेली खिडकी, त्या बद्धल एक गंमतीदार उपपत्ती (theory) आहे. हे तत्त्व प्रथम सादर केले ते जेम्स विल्सन आणि जॉर्ज केल्लिंग ह्या दोन सामाजिक शास्त्रज्ञानी. 'द अटलांटिक'  ह्या मासिकाच्या मार्च १९८२ च्या अंकात ही संकल्पना प्रकाशित केली. मोडक्या खिडकीचे उदाहरण देऊन हे त त्त्व वाचकांपुढे ठेवले आणि म्हणूनच हे शीर्षक 'ब्रोकन विंडो'.
एक इमारत. इमारतीच्या काही खिडक्या मोडलेल्या असतात. त्यांच्या दुरुस्तीकडे काही काळ दुर्लक्ष. परिणाम - हा असा: काही गुंड (vandals), ज्यांची मुळात प्रवृतीच असते ती विनाकारण मालमत्तेची नासधूस करण्याची. त्यांचे लक्ष वेधले जाते त्या मोडक्या खिडक्यांकडे. अधिक खिडक्या मोडल्या जातात. हे काय? काही खोल्या चक्क रिकाम्याच! कोणीच रहात नाहीत. चला इथेच आपला तळ ठोकूया! मग झाले तेथे ह्या गुंडांचे साम्राज्य!

कोणा एका शहरात असते एक तीन मजली इमारत, 'शांती कुटीर' असे होते तिचे नाव. प्रत्येक मजल्यावर आलिशान व स्वतंत्र असे ७५० चौ. फु. २ BHK चे दोन-दोन  ब्लॉक्स आणि एकूण ८ ब्लॉक्स मध्ये राहत होती वर्षानु वर्षे आठ कुटुंबे. सारे कसे रहात होते आनंदाने, गोडीगुलाबीने आणि शांततेने. खरोखरच ती होती 'शांती कुटीर'! प्रत्येक कुटुंबाच्या सात-आठ पिढ्या झाल्या असाव्यात. कुटुंबे वाढत होती तरी सारे सारे एकत्र नांदत होते - चार पिढ्या. 

पण परिस्थिती हळू हळू बदलू   लागली होती. जागे अभावी म्हणा, उच्च शिक्षणा साठी किंवा कामानिमित्त म्हणा तरुण मुले बाहेर पडू लागली. काहींनी स्वतंत्र असा आपला संसार थाटला, तर काही परदेशात स्थायिक झाले. घरी राहिले ते म्हातारे - गोतारे. इमारतीच्या डाग-डूगी कडे दुर्लक्ष होऊ लागले. कालांतराने स्थिती फारच बिघडली. कमानिना, भिंतीना  आणि छतांना भेगा पडू लागल्या होत्या. स्थानिक नगरपालिके कडून घर दुरुस्त करण्या बाबत नोटीसा येऊ लागल्या. पण त्या कडेही दुर्लक्ष केले आणि अखेर  ती इमारती धोकादायक असल्याचे घोषित केले गेले आणि सर्व रहिवाश्यांना तेथून हलवण्यात आले. ही धोकादायक असलेली 'शांती कुटीर' कित्येक वर्ष त्याच स्थितीत उभी होती. तिला पडलेही नाही वा ती पडलीही नाही. 
भिंतीनवर रानटी वेल चढू लागले होते . सभोवती रोपटी आणि झाडे-झुडपे वाढली होती. जग्गू दादा, चकण्या विल्या, शेक उस्ताद आणि त्यांचे इतर दोस्त रोज तेथे ड्रग्स सेवन करण्यास आणि जुगाराचे डाव मांडण्यास येऊ लागले. चाणक्य शेक उस्ताद्च्या नजरेत ती इमारत प्रथम पडली आणि --"अरे जग्गु  दादा, तुझे मै ऐसी जागा दिखता. कोई आता जाता नाही. साला वहाँ पुलिसका खतरा नहीं। हम चैनसे सभकुछ कर सकते है - दारु, चरस गांजा, जुआं, बाकि लफड़ा बाजी, सभ!" आणि मग बनला त्यांचा अड्डा!
पावसाचे दिवस होते. शंकर यादवची पाईपलाईन लागून असले झोपडी नष्ट झाली होती - नाही केली होती. त्याचे बरेचसे सामानही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लंपास केले होते. आपले उरलेसुरलेले सामान डोक्यावर घेऊन तो आपल्या बायको व चार मुलां बरोबर पायपीट करीत असताना ह्या पडीक इमारतीने त्याचे लक्ष वेधले. खिडक्यांना लटकणारी कोळीष्टके, भिंतीवर रानटी वेल आणि इमारतीची एकूण स्थिती पाहून ती रिकामी असल्याचे शंकरने ताडले होते. "चलो ये खाली मकानमा हम आज रात रह लेंगे, तुम का कहती है, वासंती?" त्या रात्रीचा त्यांचा तो  मुक्काम कायमचा झाला. कारण सरकार किंवा नगरपालिकेला त्यांच्या वास्तव्याची जाणीवच नव्हती. एवढेच नाही तर ह्या भागात  'शांती कुटीर' नावाची पडीक धोकादायक घोषित केलेली इमारत असल्याचाही विसर पडला असावा. त्यांच्या प्रमाणे इतरही आले आणि सुरु झाली घुसखोरी. हे काय? काही खोल्या चक्क रिकाम्याच! कोणीच रहात नाहीत. चला इथेच आपला तळ ठोकूया! घरात वीज आणि पाणी नव्हते. पण नळ लाईटचे स्विच- बटणे व पंखे होते. खिडक्या आणि दारे अजूनतरी शिल्लक होती.
  वाऱ्या - पावसाने खिडक्या मोडू लागल्या होत्या. काही गुंड (vandals) प्रवृत्तीच्या व्यक्ती , ज्यांची  मुळात प्रवृतीच असते ती ही विनाकारण मालमत्तेची नासधूस करणे. त्यांचे लक्ष वेधले गेले त्या मोडक्या खिडक्यांकडे. अधिक खिडक्या मोडल्या गेल्या.केवळ काही महिने झाले असतील आणि पाण्याचे नळ,  लाईटचे स्विच- बटणे, पंखे, दारे- खिडक्यांच्या कड्या गायब झाले. तरुण युवा जोडप्यांचा, चोरट्यांचा, ड्रग अॅडीक्स आणि इतर उपद्रवी लोकांचा अड्डा बनला होता. ! मग झाले तेथे ह्या गुंडांचे साम्राज्य!
ह्याला म्हणतात 'ब्रोकन विंडो' परिणाम

विल्सन आणि केल्लिंग ह्या दोघांच्या पूर्वी स्टेनफोर्ड मधील एका मानसशास्त्रज्ञ फिलिप झिम्बार्डोने 'मोडक्या खिडकी' ची कल्पना १९६९ मध्ये एका प्रयोगाच्या माध्यमातून पडताळून पाहिली होती. झिम्बार्डोने एका लायसन्सप्लेट नसलेल्या मोटरगाडीचे नियोजन केले. गाडीचे हूड उघडे ठेऊन ब्रोन्क्षच्या  (Bronx) परिसरात उभी केली आणि तशीच दुसरी गाडी तसीच कार्यहीन अवस्थेत  कालीफोर्नियातील  पालो अल्टो मध्ये उभी केली.
दोन आठवडे झाले तरी केलिफ़ोर्नियातील गाडीला कोणाचा हातही लागला नाही. पण ब्रोन्क्ष मधल्या गाडीच्या बाबतीत त्यांना वेगळाच अनुभव आला. मिनिटाभरातच त्या गाडीवर अतिक्रमण झाले. पहिले 'vandals' ) आले ते होते एक कुटुंब - आई, वडील आणि त्यांचा लहान मुलगा- त्या मुलाने रेडीएटर आणि  बॅटरी लंपास केली. चोवीस तासांच्या आंत गाडीतील सर्व मौल्यवान वस्तू गायब! नंतर गाडीच्या खिडक्यांच्या काचा  व  विंड शिल्ड पूर्ण चक्कचुर! गाडीतील नरम मुलायम गाद्या (upholstery) फाडून टाकल्या होत्या. दारांचे भाग पळवण्यात आले होते. द्वाड उनाड मुले गाडीच्या टपावर खेळत होती, टपावरून खाली उडी जमिनीवर आणि जमिनीवरून परत टपावर - तळ्यात-मळ्यात, गाडीत लपाचुपि, चोर -शिपाई, आणखी काही खेळ खेळत  असतील.
केलिफोर्नियातील गाडीला उजून कोणही साधे शिवले देखील नव्हते. मग झिमबार्डोने जाणूनबुजून  एक हातोडा घेऊन त्या गाडी जवळ गेला आणि गाडीची तोडफोड करू लागला. त्याचे हे वागणे इतराना 'catalist ' ठरले. मग जमलेले लोक त्याला साथ देऊ लागले, ते पण त्याला गाडीची नासधूस करण्यास मदत करु लागले.
झिमबार्डोच्या ध्यानात आले की  दोन्ही गाड्यांच्या बाबतीत  सुरवातीला आले ते सारे 'vandals ' चांगले पेहराव केलेले सभ्य घरंदाज वाटत होते. आणि लोकांची प्रवृत्ती सारखीच, फरक होता तो हा की ब्रोन्क्ष मध्ये आपली  मालमत्ता अशी वाऱ्यावर सोडून जाण्याचे प्रकार वारंवार घडत, ज्यामुळे 'कोणालाही काय फरक पडत नाही' ह्या जाणिवेचे स्पंदन ('नो वन केअर्स ' vibe)  आणि म्हणून विध्वंसक वृत्ती व गुंडगिरीचे प्रकार देखील तितक्याच जलद गतीने घडत असावेत.  आणि केलिफोर्निया  सारख्या सुसंस्कृत वस्तीत जेंव्हा अशा काही घटना घडतात तेंव्हा   म्यूचूअल रीगार्ड / एकमेकांचे सोयरसुतक आणि दिवाणी  बंधने कमी होतात आणि 'नो वन केअर्स ऑर बॉदर्स ' No one bothers or cares’ ही भावना  जागृत होते. आपल्याला नसती  पंचाईत कशा करिता -- कोण सांगते उठाठेव करायला… कोणाला ही गोष्ट खटकत नाही मग करुद्या ना इतरांना हवे तसे!
  पण 'ब्रोकन विंडो'मूळ कल्पना फ्रेडेरिक बस्टीअट  ह्यांच्या 
'Ce qu'on voit et ce qu'on ne voit pas' (जे बघितले आहे आणि जे बघितले नाही")' ह्या निबंधातून घेतलेली आहे.हा निबंध एक नैतिक गोष्टीच्या (as a parable, which is also known  as the broken window fallacy or glazier's fallacy) रूपाने १८५० साली सादर केला होता. [ग्लेझीअरने (काचवाला)चुकीचे तर्क करून काढलेला निष्कर्ष]:
सुस्वभावी दुकानदार, जेम्सच्या क्रोधाचे  साक्षीदार तुम्ही कधी झाला नसाल. त्याच्या निष्काळजी मुलाने दुकानाच्या दाराची काच फोडली होती. त्याच्या आरडाओरडी मुळे बरीच मंडळी जमली होती, आणि जमलेले बघे लोक, चांगले ३० असावेत, त्याचे सांत्वन करीत होते," हा वाईट प्रवाहाचा परिणाम आहे, ज्या पासून कोणाचाच फ़ायदा नाही! सर्वांनाच जगायचे आहे. मग जर काचाच कधीच फुटल्या नाहीत तर बिचारा काचवाला जगणार कसा?"

अशा रीतीचे सांत्वन हे ह्या 'ब्रोकन विंडो फ़ेलेसि 'चे आधारस्तंभ आणि अशाच चुकीच्या तर्कां वरून  काढलेल्या  निष्कर्षावर अवलंबून असतात आर्थिक संस्था. 
आपण गृहीत धरूया. नवीन काच लावून दार दुरुस्त करण्यास लागतील रु ८०. मला त्याचा विरोध नाही. तुम्ही चांगले कारण सांगितले - काचवाल्याचा फायदा! काचवाला येतो, काच लावून दार ठीक करतो, रु. ८० घेतो त्या निष्काळजी मुलास मनापासून आशीर्वाद देऊन निघून जातो. हे तुम्ही सारे पाहिले. हे सारे झाले 'जे बघितले आहे'. आणि तुम्ही निष्कर्ष काढाल काच फोडणे ही झाली चांगली गोष्ट - काचवाल्याचा फायदा आणि त्याच बरोबर काच-कारखान्याला उत्पन्न, कारखान्यातील कामगाराला मिळकत!

 पण तुम्ही बघितले नाही ते हे की आपल्या दुकानदार जेम्सने रु. ८० दुसऱ्या कशा साठी  अगोदरच खर्च केले होते आणि तो आता काच लावण्या साठी परत खर्च कसा करणार? कदाचित त्याला आपले जुने बूट दुरुस्त करायचे असतील किंवा दुकानात नवीन पुस्तके आणायची असतील. हे तुम्ही बघितले नाही. आणि हे झाले 'जे बघितले नाही'.  चुकीचे तर्क करून काढलेला निष्कर्ष म्हणून  फ़ेलेसि !

.'ब्रोकन विंडो' ह्याला आपण तर्कशास्त्रातील एक विधान म्हणूया. अशाच  आणखी एका संकल्पनेचा उलेख करावासा वाटतो तो म्हणजे माल्कोम ग्लैडवेल ह्यांच्या "The Tipping Point” चा. The Tipping Point म्हणजे कलंडण्याचा क्षण होय. प्रत्येक बाबतीत असा एक क्षण असतो. पाण्याचे १०० औ. सी. ला उकळून वाफेत रुपांतर होते. त्याला आपण  उत्कलन अंक   किंवा उकळ बिंदू म्हणतो, बरोबर? धरणाला असते धोक्याची पातळी आणि 'क्रिटिकल मास' हा अणु विभाजनाचा तोच जादूचा क्षण. प्रत्येक गोष्टीला असतो हा जादूचा क्षण - उकळ बिंदू,  मग ती एखादी कल्पना असो, एखादी सवय असो, एक फॅशन असो, नवीन कल किंवा प्रथा असो - एक लक्ष्मण रेषा आणि त्या गोष्टने जर का तो बिंदू गाठलाच की मग गोष्ट वणव्या सारखी पसरते. थोडक्यात टीपपिंग पॉइन्ट म्हणजे तोच जादूचा क्षण जेंव्हा एक कल्पना, सामाजिक प्रथा, फॅशन किंवा सवय मर्यादेचा बांध ओलांडून वणव्या प्रमाणे फैलावते.

भावना संसर्गजन्य असतात. एखाद्या रोगाची साथ पसरते त्याच प्रमाणे त्याही सहज फैलावतात. ह्यालाच आपण 'ब्रोकन विंडो' किंवा 'टीपपिंग पॉइन्ट' परिणाम म्हणूया. ह्याच परिणामां मुळे घडत असतात बदल, काही चांगले तर काही वाईट. सुरवात होते एका कल्पनेने, कल्पनेची होते एक लाट,  लाटचे होतो प्रवाह, प्रवाह बनतो एक लढा- चवळ- क्रांती!
मला राजकारणाचा गंध नाही आणि माझे इतिहासही तितकेसे चांगले नाही. तरीही मला वाटते खालील घटना ह्याच 'ब्रोकन विंडो' किंवा 'टीपपिंग पॉइन्ट' परिणामां मुळे घडल्या! 

आपला स्वातंत्र्याचा लढा:
स्वतंत्र चळवळीतील मिठाचा सत्याग्रह ह्याची सुरवात १२ मार्च, १९३० साली दांडी यात्रेने (मोर्चेने) सुरु झाली. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली हा, भारतातील तत्कालीन ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टींवर लावलेल्या कराच्या विरोधात सत्याग्रह होता. अहमदाबाद मधील साबरमती आश्रमातून हा मोर्च्या २४० मैल अंतर पार करीत २४ दिवसा नंतर म्हणजे ५ एप्रिल १९३० रोजी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी नवसरीतील दांडीच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचला. गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला आणि तेव्हा कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणावरील चळवळीला (Civil Disobedience Movement) सुरवात ठरली.
स्वतंत्र्याच्या लढ्यातील काही बोलकी क्षण चित्रं :




आपली संयुक्त महाराष्ट्रासाठी चळवळ:
सर्व मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचे भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वाच्या आधारावर एक राज्य स्थापन करण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला संयुक्त महाराष्ट्र आंदोलन किंवा चळवळ  होय. ही चळवळ स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झाली आणि १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर ती समाप्त झाली. १९५० ते १९६० या काळामधील महाराष्ट्रातील हे सर्वांत व्यापक असे जनआंदोलन होते आणि त्यात शंभराहून अधिक लोकांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला.महाराष्ट्रात मराठी भाषिक राज्याची म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे आंदोलन दिनांक १२ मे १९४६ रोजी बेळगाव येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समितीच्या स्थापनेपासून विशेष आकारास येऊ लागलेसंयुक्त महाराष्ट्राचा लढा लढविण्यासाठी काँग्रेस पक्षीय पुढाऱ्यांना दूर सारून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीची ६ फेबुवारी १९५६ रोजी स्थापना केली. प्रजा समाजवादी पक्षाचे नेते एस्. एम्. जोशी त्याचे प्रमुख होते. यांत प्रजा समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, हिंदु महासभा, सोशॅलिस्ट पार्टी व जनसंघ हे पक्ष सामील झाले. नंतरच्या काळात डॉ. आंबेडकरांच्या संमतीने शेडयूल्ड कास्ट्स फेडरेशन व नंतरचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांत सामील झाला. एस्. एम्. जोशी, भाई श्रीपाद अमृत डांगे, ना. ग. गोरे, आचार्य प्र. के. अत्रे, उद्धवराव पाटील, माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, जयंतराव टिळक प्रभृती हे या चळवळीचे नेते होते.संयुक्त महाराष्ट्र समितीची संयुक्त महाराष्ट्रासाठी चळवळ चालूच राहिली.पक्ष, पंथ, जात, धर्म हे सर्व भेद या चळवळीत गाडले गेले होते. आणि त्याचाच प्रत्यय सलग पाच वर्षे प्रचंड जनआंदोलनाने या महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवला समितीने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळविला आणि मुंबईचे महापौरपद समितीस मिळाले.संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन ही स्वातंत्र्य चळवळीनंतरची महाराष्ट्रातील व्यापक लोकसमर्थन असणारी चळवळ होती. हे राज्यातील पुरोगामी चळवळीचे सर्वांत मोठे व व्यापक आंदोलन होते. या चळवळीत महाराष्ट्रातील मध्यमवर्ग, कामगार, शेतकरी, विचारवंत आदी समाजातील सर्व स्तर एकत्र आले होते. याशिवाय शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर साबळे, पिराजीराव सरनाईक, आत्माराम पाटील वगैरे शाहिरांनी उभा-आडवा महाराष्ट्र पिंजून काढला व हे आंदोलन गावोगावी पोहोचविले.





असे अनेक चांगले परिणाम झाले असतील ह्या 'ब्रोकन विंडो' किंवा 'टीपपिंग पॉइन्ट' इफ्फेक्ट मुळे.

पण ह्या 'ब्रोकन विंडो' किंवा 'टीपपिंग पॉइन्ट' परिणामा मुळे असेही घडते :
आपण रस्त्यातून जात असतात. रस्त्याकडील इमारतीतून केळीचे साल फेकले जाते. आपल्या जवळच ते पडते. आपल्या बाजूने जात असलेला इसम त्याच्या हातातील फ़ेकावु कागदी पुडी पडलेल्या सालाच्या दिशेने  भिरकावतो. तुम्ही त्या कडे दुर्लक्ष करीत पुढे जाता. कारण- तुमच्या 'नो वन केअर्स ऑर बॉदर्स ' No one bothers or cares’ ही भावना  जागृत झालेली असते. आपल्याला नसती  पंचाईत कशा करिता -- कोण सांगते उठाठेव करायला… कोणाला ही गोष्ट खटकत नाही मग करुद्या ना इतरांना हवे तसे!  इतरही तसाच विचारात करून आपापल्या मार्गाने निघून जातात आणि मग होते असे घडते :
येणारे  जाणारे पादचारी  आणि वाहनचालक आपल्याला नोको असलेली वस्तू बिनधास भिरकावतात त्याच  दिशेने आणि मग रस्त्याच्या कडेला बनतो  भला मोठा कचऱ्याचा ढीग!


 रस्त्यातून जात असताना आपली नजर ह्या पटी पाटी कडे जाते ‘Do not spit here’आणि हा गाडी चालक चक्क ह्या पाटीवरच पानाची पिचकारी मारतो  -- काय धक्का बसला?




"गाडी वाला आहे मी, किश्यात पैसा आहे माझ्या, दंड भरायला कोण घाबरतोय!"
 
हिचका आपली स्वच्छता मोहीम ....... ! येथे स्वच्छ असे  काय आहे, बरं?

आणि हे काय? स्वच्छ सौचालय? आणि ह्या (अ)स्वच्छ सौचालया बाजूला आहे एक कॅन्टीन आणि समोर हॉस्पिटल, दोन इस्पितळे, एक चक्क महात्मा गांधीजींच्या स्मरणार्थ. कॅन्टीनच्या एका बाजूला सौचालय तर दुसऱ्या बाजूला केराच ढीग आणि गल्लीच्या नाक्यावर उभी असते एका फळ वाल्याची गाडी. तो विकत असतो कापलेली फळे. हे सारे आपण पाहत असतो - ब्रिजवरून चौपाटीला येणारे तुम्ही- आम्ही , इस्पितळात येणारे डॉक्टर व कर्मचारी आणि रोगी व त्यांचे हितचिंतक, दुर्लक्ष करून पुढे निघून जातो. कोणालाच काहीच पडले नाही. त्या कॅन्टीमध्ये खाणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा आपण कशाला विचार करा? तुम्ही- आम्ही सारे तर पॉश हॉटेलात खातो! मग आपण का त्यांचा विचार करा! 

 
आणि बापरे! हे काय? रस्त्यात चालायचे तरी कसे? वाहतुकीचे कायदे चक्क धाब्यावर बसवतात की हे सारे! फूटपाथ आहे कोठे?   मोटार सायकल - एक, दोन तीन, एका मागोमाग --- भली मोठी रीघ हो! 
 
  उज्ज्वल भविष्य असणारच पण वर्तमानाचे काय? 



[This path is meant for the pedestrians, but handcarts, tempos are parked. Where are we to walk? Walk on the road avoiding bikes and heavy vehicles and try your luck on Thakurdwar road, where Metro work is in full swing.]

माझ्या लहानपणीचे हे चर्नी रोड स्टेशनचे चित्र आपण आपल्या डोळ्यांसमोर आणा. आहे का हो, हे तुमच्या जाणवित? रेल्वे लाईनला लागून एक कुंपण / कठडा आणि कुंपणाला लागून मोकळा फूट पाथ -- बाजूला एकही झोपडी नाही ... सारे कसे स्वच्छ!
 






मग आली एक झोपडी, एकाच्या  झाल्या दोन  आणि दोनाच्या तीन! आणि आज उभ्या आहेत चक्क ५ झोपड्या. आणि उद्या आठ असे करता करता असे तर होणार नाही ना? गिरगावांत धरावी  - अजून एक भली मोठी झोपडपट्टी!


 आता हेच पहा. ह्या इमारतीत रहातात ------ तळ मजला कार्मशिअल ३ गाळी: १) औषध - वितरक   (बहुदा बेकायदेशीर, FDA , BMC चे नियम ? ), २) डिजिटल प्रिंटर & ३) आर्ट प्रिंटर ; पहिला मजला रिकामा ( सारा परिवार बिल्डींग एकूण परिस्थिती पाहून आपल्या दुसऱ्या आलिशान  ब्लॉक्स मध्ये निघून गेला); दुसऱ्या मजल्यावर एक म्हातारे जोडपे; तिसऱ्या मजल्यावर एकच व्यक्ती आणि चौथा मजला पण रिकामा. प्रत्येक मजल्यावर आहेत एक किचन, दोन बेड-रूम्स,  मोठा हॉल अशा , संडास-बाथरूम व वारांडा वगळून,  ४ मोठ्या खोल्या. पण कोणीही किचन वापरीत नाहीत, कारण त्या खोल्यांत टेकू लावण्यात आले आहेत. इमारतीला बाहेरून तडा गेल्या आहेत. प्लास्टरिंग खराब होऊन विटा दिसू लागल्या आहेत. रहिवाशी श्रीमंत असून सुद्धा बिल्डींगच्या दुरुस्ती कडे दुर्लक्ष करीत आहेत. ही इमारत धोकादायक असल्याचे घोषित का केले  जात नाही? पालिके कडून किंवा म्हाडा कडून त्या साऱ्यान नोटीस अजून येत कशी नाही .ह्या बिल्डींग खालून शाळकरी मुल-मुलींची ये जा असते. अधून-मधून एखादे कौल, प्लास्टरचा भाग किंवा विटेचा तुकडा कित्येकदा खाली पडले असतील. फायर ब्रिगेडचे बंबही येउन गेले आहेत. उद्या काही अनुचित घेडले तर त्याला जबाबदार  कोण?

आणि ह्या इमारती कडे पहा. मोडकळीस आलेले छप्पर आणि पहिला मजला चक्क असा झाकून ठेवलाय.

काही वर्षांपूर्वी बांद्रा (पूर्व) ही होती एक सरकारी कर्मचाऱ्यांची एक वसाहत. आज पहा ह्या उभ्या आहेत त्या १५ - १६ पडीक इमारती:


सहा महिन्यांपूर्वी त्या इमारती धोकादायक असल्याचे घोषित केले गेले आणि इमारती रिकाम्या करून सरकारी कर्मचाऱ्यांना हलवण्यात आले. केवळ सहाच महिने झाले असतील आणि आज प्रत्येक घरातील पाण्याचे नळ,  लाईटचे स्विच- बटणे, पंखे, दारे- खिडक्यांच्या कड्या गायब आहेत. तरुण युवा जोडप्यांचा, चोरट्यांचा, ड्रग अॅडीक्स आणि इतर उपद्रवी लोकांचा अड्डा बनला आहे. शक्ती मिल सारखा परिसर तर बनत नाहीना?

हीच आहे 'ब्रोकन विंडो'ची  संकल्पना आणि असे असतात 'टीपपिंग पॉइन्ट' चे परिणामा. लक्षात आला कां हा 'ब्रोकन विंडो इफ्फेक्ट '? मग राहाल का आपण गाफील? "आपल्याला नसती  पंचाईत कशा करिता -- कोण सांगते उठाठेव करायला… कोणाला ही गोष्ट खटकत नाही मग करुद्या ना इतरांना हवे तसे." असे बोलून पुढे जाऊ नका. ब्रोकन विंडो दुरुस्त करा!

                                                                                                   विनय त्रिलोकेकर