Wednesday, 10 July 2013

आयुष्यातील गमती-जमती

आयुष्यातील गमती-जमती

आम्ही पाच भावंडे 

मी  घरातील शेंडेफळ. माझ्यावर चार बहिणी, पुष्पा,उषा,निशा आणि शिबानी (शुभा ). आमची सर्वात मोठी बहिण पुष्पा. माझ्यात आणि तिच्यात दहा -बारा वर्ष्यांचे अंतर. ती लहान वयातच आचार्य अत्रेंच्या 'मराठा' मध्ये  नोकरी करू लागली. तारा रेड्डी, हमीद दलवाई, शैलाताई पेंडसे, इत्यादी लोकांचे येणे जाणे आमच्या घरी सुरु झाले. 'संयुक्त महाराष्ट्र' ची चळवळ चालू होती. चळवळ मोडण्यासाठी धर- पकडीचे सत्र चालू होते. पुष्पाला पकडण्यात आले. आमची आई रडू लागली. अंबर मामाने तीस समजावले, " अग, चांगली गोष्ट आहे ग, अभिमानाची गोष्ट आहे." तुरुंगातून सुटल्या नंतर तिचा चाळीत सत्कार करण्यात आला. ह्या सर्वांचा अर्थ आणि महत्व त्यावेळी नीटसा समजला नसेलही.

अभिमान वाटणे वगैरे सर्व ठीक आहे. जगासाठी असेल ही 'मोठी' लेखिका, पत्रकार पण कधी कधी वागायची  एखाद्या लहान  मुला प्रमाणे. मला एक किसा आठवतो.  आमची आई आपल्या मुलांच्या बाबतीत फारच possessive! आम्हा सर्वांची काळजी फार करायची. एकदा पुष्पा आणि माझी दुसरी बहिण, निशा लोणावळ्या गेल्या होत्या. परत येताना त्यांना बराच उशीर झाला. रात्रही फार झाली. आई मला म्हणाली, " त्यांना बघाला जाऊया ?"
" त्या जीपने येत आहेत. त्यांना शोधण्या साठी आपल्याला एक हेलीकॉप्टर हवे. तेंव्हा फोन करून हेलीकॉप्टर मागवू का? आपल्या कडे फोन आहे कोठे?"
पण गंमत तर नंतर आली. घरी परतल्यावर आपल्याला उशीर कसा झाला ते सांगितले. जीपचा टायर पंक्चर कसा झाला, वगैरे,वगैरे. कशी धमाल केली ते सांगितले.  सकाळी खाल्लेल्या चिकन-बिर्याणीची चव कशी जिभेवर राहिली आहे  हेही सांगितले. पण आईचा राग काही शांत झाला नव्हता.
पुष्पा चुलीवरील भांडी उघडून पाहू लागली. "हे काय, आई? आज सोमवार आहे, तुला माहित नाही का? मला फराळाचे काही ठेवले नाहीस? --"
"काय ग, सकाळी चिकन बिर्याणी आणि मटण चॉप खाऊन तुझा उपवास कसा काय?", मी विचारले. मग आंम्ही सगळे हसू लागलो. पुष्पाला 'शांत' असल्याचे  सर्टिफिकेट आमचे एक चुलत काका नेहमी देत. सुंदर काका नवसारीला असत. अधून-मधून मुबईला येत. घरी येत तेंव्हा माझ्या साठी काहीतरी आणीत. पण मला सर्वात आवडत होत्या त्या फुलबाजीच्या कांडे पेट्या. काका पुष्पाला बटाट्याची भाजी बनवण्यास सांगत आणि तिने केलेली लाल भडक भाजी त्यांना फार आवडे. तिने केलेले खाण्याचे प्रायोगिक पदार्थ आम्ही घाबरत घाबरतच खात. एकदा तिने चॉकोलेट केले, केवळ वाटीभर. निशा,शुभा, आई आणि मी(उषाचे लग्न झाले असावे त्या वेळी), साऱ्यांनी मिळून चाखले असेल जेमतेम पाव वाटी. 'आवडले नाही' असे तीस सांगितले. 'To call a spade, a spade' ही आम्हाला मिळालेली शिकवण. " काय वाईट आहे. का आवडले नाही? ", असे म्हणत पुष्पाने राहिलेली ३/४ वाटी संपविली. टी. व्ही.त  पाहिले , 'आम्ही सारे खवय्ये' मध्ये असावे, तिने केलेले कारल्याचे आणि दुधी भोपळ्याचे आईस क्रीम. मी अजून तरी तिच्या हातचे हे पादार्थ खाल्ले नाहीत. पण माझ्या मामी आणि मामे भाऊ नृपाल सांगतात, " खरोखर  दोनही आईस क्रीम स्वादिष्ट होते आणि तिने केलेले  जेवण देखील." तुम्ही म्हणाल ' घरकी मुर्गी डाल बराबर।" पण  म्हणतात ना , पाण्यात पडल्यावर ---.

उषाचे लग्न तसे लवकरच झाले.  निशा सोडून आम्हा इतर भावंडांचे कामाचे वावडे. शुभा अधून-मधून काम करीतही असे पण ती पडली अति 'SLOW' आणि त्यांत ती पडली भ्रमिष्ठ. ती केर- कचरा काढीत असे. पण तसे करीत असताना तिला वहीचे पान, जुने वर्तमान पत्र किंवा कोणताही लिहिलेला कागदाचा तुकडा सापडलाच तर कचऱ्याचे काही खरे नव्हते - तिच्या हातातील झाडू तसाच आणि तिचे डोके आणि डोळे मजकूर वाचण्यात गर्क. "ए शुभा, हात हलवकी. तो कागद बाजूला ठेव." पण आईच्या बोलण्या कडे तिचे लक्ष असायचे कोठे. ती आपली आपल्या वाचण्यात किंवा आपल्याच दुनियेत. आमच्या घरी पाहुण्यांची बरीच वर्दळ असायची. कोण पाहुणा आला की शुभा बेबीताई कडे पळायची, हातचे काम सोडून. ती तेथे ताईच्या गोष्टी ऐकण्यात रमायची. मलाही बेबीताई कडून गोष्ट ऐकण्यास मजा वाटायची. नवलाची गोष्ट म्हणजे ती इंग्रजी चित्रपट पाहून, ती गोष्ट उत्तम रित्या सांगे. चित्रपटातील नायक-नायिकांच्या नावासकट. 'रोमन हॉलीडे' जेंव्हा मी प्रत्यक्ष पहिला तेंव्हा ताईने केलेले वर्णन कसे हुबेहूब होते त्याची जाणीव झाली. तिला इंग्रजी समजत नव्हते मग ती चित्रपटातील गोष्ट सुंदर रित्या कशी काय सांगायची?

माझ्या भाच्याने (संजीव, तिचा मोठा मुलगा) सांगितलेला किस्सा फारच मजेशीर होता. कदाचित त्याची अतिशयोक्ती असावी. संजीव लहान होता. असेल ३री -४थी मध्ये. शुभाचे काम आटोपले. संजीवला शाळेत सोडण्यास तसा उशीर झाला होता. "संजू! अरे, चल लवकर. शाळेला उशीर होत आहे. भर ती पुस्तके ब्यागेत  आणि चल,"शुभा स्वतःचा एका हाताने पुस्तके दप्तरात कोंबित व दुसऱ्या हाताने  संजीवचा एक हात खेचीत - ओढीत घरा बाहेर नेण्यास सुरवात केली.
   " पण आई, जरा थांब, " संजीव शुभाला विनवण्या करीत होता, काही सांगू पाहत होता.
पक्कड अधिकच घट्ट करीत ती त्याला शाळेच्या दिशेने ओढू लागली. तिचे त्याच्या कडे लक्ष नव्हते.
अर्धा रस्ता पार केला. शुभाचे चालूच, " बेल होईल. आज फार उशीर झालाय. उचल न रे पाऊल भराभर."
संजूचे , "पण आई--- " पण आई ---" चालूच होते. शाळा जवळ येताच संजीव ओरडून म्हणाला," पण, आई बघ की माझ्या कडे."
आता मात्र शुभाने त्याच्या कडे बघितले. " अरे मेल्या, हे काय? तुझे शर्ट कोठे आहे? का घातलास नाही?" 
  " आई, मी मगा पासून तेच सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. माझे शर्ट घालण्याचे बाकी होते."

असा सारा प्रकार!   मग आईने ठरवले,  काही कामे वाटून घ्यावयाची. बिछाने  काढणे- जो कोणी उशिरा उठेल त्याने ते काढणे. आई उठताच मी ही जागा होत असे आणि आईला सांगे, " बघ आई, मी उठलो आहे पहिला. जरा दहा मिनिटे पडतो." मग आई इतरांना सांगे ," विनय सर्व प्रथम उठलाय."
बहुदा पुष्पाच उशिरा उठत असे. पण आपले बिछाने उचलण्याचे काम ती शुभावर अश्या पद्धतीने टाकीत असे,  " ए शुभा,उचल न ग बिछाने माझ्या साठी. चार आणे देते."  चार आण्याचे आमिष म्हणा किंव्हा मोठ्या बहिणीचा आदर/ धाक, कोण जाणे? पण पुष्पा आपले काम साधायची. कदाचित मी एकदाच काढले असावेत, ते सुधा एक रुपयाच्या मोबदल्यात.

साऱ्या बहिणींनी मिळून माझ्या विरुद्ध एक कारस्थान रचले. ही न ती करणे देत मी कोणतीच कामे करीत नाही, असे त्यांना वाटे. मग ठरवले गेले- रात्रीचे बिछाने घालण्याचे काम माझे. काही रात्री मी ते केले देखील. मग ते काम टाळू लागलो. अभ्यासच्या निमित्ताने मी माझ्या मित्रा कडे जात असे. मुद्धाम रात्री उशीर येऊ लागलो. घरी न येता ' समोर' धराधरांकडे वेळ काढीत बसून राही. आईला झोपण्यास उशीर होऊ नये म्हणून निशा माझ्या वाटणीचे बिछाने घालू लागली. रात्री उशीर झालाकी मला हांक मारण्यात यायची. खालून मी आमच्या खिडकी कडे बघायचो. काळोख पाहून अंदाज करायचो सारे झोपले असणार. मग वर जावयचो आणि खरोखर  बिछाने घातलेले असावयाचे. मला असुरी  आनंद होत असे.  पण पुष्पा-उषाला ते खपत नव्हते. आणि मग ---
रात्रीचे ९ वाजले होते. मी समोरून धराधरांच्या खिडकीतून  वर आमच्या खिडकी कडे पहिले. काळोख! इतक्या लवकर सारे झोपले? चला, आपण ही लवकर झोपू. मी वर गेलो. दार उघडून आंत शिरलो. अचानक टूब लाईट लागला. सारे बिछाने घालण्या साठी माझी वाट बघत होते! मला नोकरी लागताच पहिल्या पगारात बिछाने घालण्या करिता रामचंद्र नावाचा मी एक गडी ठेवला.



मी, माझा अभ्यास आणि माझें शालेय जीवन 

माझ्या चारही बहिणी वाडीतील कमळा बाई शाळेत (Student Literary & Scientific Society's Girls' High School मराठी माध्यम) शिकल्या. तसे मलाही तेथेच मोंटेसरीला टाकले. माझ्या वडिलांची इच्छा होती की मला इंग्रजी शाळेत टाकावे. तेंव्हा मला इंग्लिश माध्यम असलेल्या शाळेत टाकणार - हे माझ्या मनात बिंबवल्या मुळे म्हणा किंव्हा 'ताई बाईंचा' सारखा  सारखा ओरडा, " हे काय आहे? अ, आ, इ? नेहमी तू किडे माकोडे काढतोस."; मला काही मराठी बाराखडी जमली नाही. शाळेत आणखी एक त्रास - माझ्या शेजारी बसणारा मुलगा, गोविंद भिडे - तो माझ्या डब्यातील दोना पैकी एक लाडू चोरायचा. बाईना सांगितले तर त्या मलाच ओरडायच्या. काही वर्षाने का होईना त्याला धडा आम्ही शिकवलाच. त्याचे असे झाले. मी व माझा एक मावज भाऊ उदय आमच्या एका मावशी कडे एकत्र खेळण्यास जात असू. भिडे मावशीच्या शेजारच्या बिल्डींग मध्ये रहात. दोघ्यांच्या खिडक्या समोरासमोर. गोविंद आम्हा दोघां बरोबर समोरून बोलत असे. तो 'नाना शंकरशेट' मराठी शाळेत तर मी सेंट सेंबास्टीयन मध्ये. दोघेही तिसरीत. बोलता बोलता तो माझ्या भावास मोठ्या फुशारकीत तो कसे माझे लाडू चोरायचा ते सांगगित असे. आम्ही ठरवले - त्याला शिक्षा करायची. उदय बेचकी मारण्यात पटाईत. एके दिवशी लपून  उदयने नेम धरून त्याला मारले. मार त्याच्या कपाळावर लागला. समोरून आरडाओरडा झाला. आम्ही काही केलेच नाही असा आव आणून एकमेका बरोबर खेळू लागलो. समोरून होणारे आरोप फेटाळण्यात आले. मावशीचा बाळ्याने ( तिचा तिसरा मुलगा) आमची बाजू घेत सागितले, " आमची ही दोन मुलं कशी शाहण्यासारखी खेळत आहेत. खिडकी पाशी गेली देखील नाहीत. मग मारतील कशी तुमच्या मुलास?" गोविंदशी त्या नंतर बोललोही  नाही किंवा त्याला पहिले देखील नाही. 

इंग्रजी शाळेत गेलो खरे. पण शाळेचा अभ्यासक्रम सोपा नव्हता. नशिबाने चांगले शिक्षक लाभले. मी त्यांचा सदैवं ऋणी राहीन. लहान वर्गात माझा अभ्यास जेंव्हा आई घेई तेंव्हा फार गंमत येई. एखादे   पाठ केलेले उत्तर ती माझ्या कडून बोलून घेई. तिला कोणता इंग्राची शब्द अडलाच तर ती मला असे काहीसे विचारीत असे:
त्या शब्दा खालील इतर मचकूर हाताने झाकीत विचारीत असे," विनय, मला ह्या शब्दाचा उच्चार सांग  आणि अर्थही."
"अग आई, हात काढ. जरा खाली तरी घे. मला तो शब्दच दिसत नाही. अजून घे खाली. हं! "
उत्तराचा बाकी राहिलेला भाग मी वाचून घ्यायचो आणि उत्तर बोलून दाखवायचो. आई आम्हा सर्वाना दिव्या समोर ' शुभोम करोति कल्याणम --' आणि नंतर माझ्या वरील बहिणीस (शुभा) व मला 'पाढे' म्हणाला सांगे.- "बे एके बे, बे दुणे चार--( २ ५ च्या पाढ्या पर्यंत) ", हे सारे शुभाचे झाल्या नंतर येई माझी पाळ. टू व्हन झा टू पासून ट्वेंटीफाईव टेन झा  पर्यंत. मग आई सुरु करीत असे 'एक पाव पाव, दोन पाव अर्धा ,--'      
"आई, पावकी-निमकी ची गरज लागत नाही. गुणाकार करून ३ x १/४  किंव्हा 4 x १/४  हे काढता येते," मी विनवण्या करायचो. पण माझी सुठका नव्हती. वरच्या वर्गात मात्र शाळेतील टीचर काढूनच समस्यांचे समाधान करून घेऊ लागलो. शाळेतील बहुसंख्य शिक्षक चांगले होते. मात्र सर्वच नाही. अपवाद होतेच. आमचे आठवी वर्ग मास्तर, (ते Social Studies शिकवीत) आर्थर, काही अश्या प्रकारे विचारणा करीत:
एखादा प्रश्न साऱ्या वर्गाला ओळी- ओळीने, प्रत्येकाला  विचारला जाई आणि शेवटला माझ्यावर असा फेकला जाई, " Vinay, you wont know the answer, would  you ?" मी पार गोंधळून जात असे. माझे इतिहास व  भूगोल राहिले कच्चे.
आमच्या उषाचे गणित चांगले होते. गणिते  सोडवण्यास तिची मदत मी घेत असे. माझा गणिताचा पाया तिने मजबूत केला. तसेच शाळेतील बुर्डे मास्तर (इंग्रजी व गणित) व केणी( फिसिक्स  - खेमिस्ट्री व गणित) मास्तरांनी तो अधिक मजबूत केला. आज त्या मुळेच मी ICSC च्या मुलांना दॆखिल शिकवतो. शाळेत सायन्स हा विषय शिक्षक ( मिश्रामास्तर, केणी मास्तर) चांगल्या प्रकारे शिकवायचे. बुर्डे मास्तराने इंग्रजी व्याकरण चांगले करून घेतले . राहिल्या फक्त दोन भाषा - हिंदी आणि संस्कृत. त्या दोन भाषेंचा अभ्यास स्वतःच करीत असे. मोजून काही वेळेला मोठ्या बहिणीकडे (पुष्पा) माझी डीफीकल्टी घेऊन गेलो असेन. मला आठवते. मी अकरावीत (S.S.C.) होतो. पहिली परीक्षा तोंडावर आली होती. संस्कृत भाषेत मला एक समस्या आली. गेलो पुष्पाकडे. 
" अरे विनय, इतके साधे येत नाही! मग तुला काहीच येत नाही. कसा पास होणार? कठीण आहेरे तुझे!"
शाळेची पहिली परीक्षा झाली. पासही झालो. पण मी 'संस्कृत' सोडले आणि घैसास मास्तरांना विनवण्या करून आणि दुसऱ्या टर्मिनल मध्ये पास होण्याची हमी देऊन ' लोवर लेवल मराठी' घेतले.

ह्या सर्व गोष्टींची व मला आलेल्या शालेय जीवनातील चांगलला-वाईट अनुभव, मला पुढे शिकवण्या करीत असताना आणि अलीकडे NGO क्षेत्रात काम करीत असताना फार मदत झाली- विध्यार्थाना समजणे आणि समजावणे, त्यांच्या समस्या सोडवणे, त्यांची नेमकी नाडी पकडणे आणि माझ्या हाता खालील शिक्षकांना  मार्गदर्शन करणे, ह्याला  मदत झाली.  


चाळीतील गमती. 

आमच्या चाळीतील मुले अति वात्रट आणि टवाळखोर! ह्याची टिंगल कर, त्याची छेड काढ, त्यांचे दिवस भर चालूच असायचे. कोणालाही नावे ठेवीत, लहानां पासून वयस्कर लोकांपर्यंत, कोणही त्यातून सुटत नसत. माझे एक काका होते - केशव राव. ते जेंव्हा बिल्डींग खालून जात तेंव्हा 'बेंद्रे, बोंद्रे-बाद्रुधीन सोलिसिटर' ग्यांग (त्या साऱ्यांचे टोपण नाव) ओरडून विचारायचे, " केसाव राव वाजले किती?"
"माझे घड्याळ बंद आहे," काकांचे एकाच उत्तर.
"तुमचे घड्याळ बंद की घड्याळ समजत नाही?" मग एकाच हशा.

वाडीत एक वयस्कर  गृहस्त होते - राम भाऊ. ते जात तेंव्हा लपून छपुन आपली  'बेंद्रे ,बोंद्रे-बाद्रुधीन सोलिसिटर' gang आरोळी ठोकायचे, " राम भाऊ, धक्के  मारू राम भाऊ!"
राम भाऊ खालून ओरडायचे, " तुमच्या आई बहिणींना पाठवा! त्यांना धक्के मारतो."
मुलांच्या आई वडलाना कदाचित हे सारे माहित नसावं.  टोळीतील मोठ्या मुलांना त्या शिवीगाळचे काहीच कसे वाटत नव्हते? कोण जाणे!

पण एकदा त्या सर्वाना धडा मिळलाच. त्यांना एक गुरु भेटलाच.  वाडीतील एक रहिवाशी, कानिटकर. आयुर्वेदिक काढे बनवणे, दारोदारी जाऊन ते विकणे, हा त्यांचा धंदा. "कानिटकर, काढे आणा,"  टोळीचा नेहमीचा त्यांना छेड काढण्याचा छंद. पण तो  दिवस वेगळा होता. नेहमी प्रमाणे ते काही न बोलताच घरी निघून जरी गेले तरी शांत बसले नव्हते. घरून काढ्यांचे दोन मोठाले पेटारे घेऊन परतले. माधुकाकांच्या घरी जाऊन त्यांना चांगलेच सुनावले, " काढे विकणे हा माझा धंदा आहे. त्यावर माझे पोट आहे - माझे घर चालते. तुम्ही वडीलधारी माणसे.आपली मुले, तुमची स्वतःची नसतील. पण तुम्ही त्यांना वडिलां समान. आता मला काढा आणण्यास सांगितले. एवढे ओझे घेऊन मी वर आलो. हा माझा माल तुम्हाला घेणे भाग आहे. ---" माधुकाकांना शंभर रुपयांची फोडणी पडली आणि त्यापुढे कानिटकरांची छेड कोणी काढली नाही.

चित्रपट 'प्यासा' (१ ९ ५ ७) तुम्ही पहिला असाल, त्यातील गाणी तरी ऐकली असाल. शाहिर लुधियानवी लिहिलेली गीते  आणि सचिनदेव बर्मनने संगीत बद्ध केलेली गाणी अतिशय लोकप्रिय आहे.  असे म्हंटले जाते की त्यातील एक गाणे -'सर जो चकराये, या दिल डूबा जाये, आजा प्यारे पास हमारे, काहे घबराये ---  चम्पी तेलमालिश।' , गुरु दत्त ह्यांनी 'Harry Black' , हुगो फ़्रेगोनिसचा  ब्रिटीश चित्रपटातील एका गाण्यांनी प्रभावित होऊन आपल्या चित्रपटात हे गाणे नंतर (१ ९ ५ ८ ) घालण्यास बर्मनदादांना भाग पाडले. असो.

आणि 'प्यासा' चित्रपटातील ह्याच गाण्याने प्रेरित होऊन आम्हाच्या चाळीतील एका प्रतिष्ठीत व्यक्तीने (मेलेल्या माणसा बद्धल वाईट लिहिणे बरोबर नव्हे, तेंव्हा नाव नको) गाणे रचले आणि आम्हा लहान मुलांना त्याच गाण्याच्या चालीवर म्हणावयास सांगितले. पडत्या फळाची आज्ञा!  सारीच मुले गाऊ लागलो --अगदी 'सर जो चकरये--' च्या चालीत , "  धर धर धर, हाता मध्ये धर. चाकू भोसकून खून त्याचा कर. कसा घाबरला, कसा पळाला, आता नाही येणार! कारे घाबरतोस, कारे घाबरतोस?" बाकी मुलांचे माहित नाही, पण मला मात्र चांगलाच ओरडा मिळाला, आई पासून बहिणीन पर्यंत. त्यांचे गाणी रचण्याचे सत्र चालूच होते. मग ' इना मीना डिका' च्या चालीवर तयार झाले 'नानी, मीना कन्या'. कदाचित म्हणूनच असेल बिल्डींग मधल्या एका मुलाची तळेगावला - बोर्डिंगला रवानगी झाली. जाण्या पूर्वी त्याच्या निरोप समारंभात तो म्हणाला देखील, " चाळीत शिकलेलो सर्व वेडेचाळे विसरण्या साठी मी  तळेगावला, बोर्डिंग मध्ये जात आहे आणि एक चांगला मुलगा बनूनच मी परत येईन. " इतरांचे माहित नाही.  त्यानंतर हे गाणे मी कधीच गायले नाही. पण त्या प्रसिद्ध माणसाने केलेले हे काव्य मात्र मी विसरू शकलो नाही. पण काय हो, ह्याला - अश्या गचाळ लेखणीस,  तुम्ही काव्य म्हणालका?

गाण्यांवरून आठवले. चाळीत अनेक 'बाथ रूम' सिंगरस होते. पण काही चांगले गात. शेजारचा सतू  सुंदर यॉडेलिंग करायचा. 'किशोर कुमारांची गाणी गाण्यात तो माहीर होता.

चाळीत सर्व सण साजरा करण्यात फार फार मजा येई. संक्रांतीला चाळीतील इतर मुले 'पत्र्यावर' जात. बिल्डींगच्या शेजारी (१ फुट अंतर) असलेल्या कारखान्याचे पत्र्याचे छप्पर व दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून शेरी ओलांडून पलीकडे त्या छप्परावर जाणे, म्हणजे पत्र्यावर जाणे. 'पत्रा' फार उपयोगी पडे - बिछाने उन्हात वाळत घालण्यापासून पापड वाळवण्यात  आणि पतंग उडवण्यात. मला मात्र तेथे जाण्यास बंदी. मी तिसऱ्या माळ्यावरून संक्रांतीची धमाल बघत असे. मधुकाका त्यांनी आकाशात 'बदविलेल्या'पतंगाचा 'मांज्या' माझ्या हाती देत. त्यावरच मी समाधान मानी. काही जण तर एखाध्या रूढी प्रमाणे (as a ritual) संक्रांतीची तयारी करीत. शरदला फक्त पतंग पकडण्यात रस. मग तो दोन-तीन काठ्या एकावर एक बांधी आणि वरच्या टोकास एक लहान झाडाची फांदी लावी. हा 'सोटा' घेऊन तो कापलेल्या पतंगा मागे पत्र्यावर धावत सुटे. दिवस भारत ५-६ 'कोड' पतंग पकडत असे पण उडवणे मात्र नाही. शरदचे क्रिकेट खेळतानाही असेच. खेळायचे नाही, पण त्याची आम्हाला मदत फार- जिन्यावरील काचेचा दिवा (इलेक्ट्रिक बल्ब) काढणे आणि खेळून झाल्यावर तो परत जागेवर लावणे, वेणीच्या सुतांचे 'नेट' तयार करून दादरावरील खिडकीस लावणे जेणे करून चेंडू (बॉल) खाली रस्त्यावर  किंवा  समोरील तळमजल्यावर धराधरांच्या अथवा पहिल्या माळ्यावरील देसाईंच्या घरी  जाणार नाही. बॉल चुकून धराधरांकडे गेलाच तर तो जप्त झालाच. म्हणूनच नेट. हे झाले शरदचे. बिल्डींग मध्ये ३ अरविंद, एक बेबीताईचा (सिनिअर मोस्ट) अरविंद ( माझी मावज बहिणीचा नवरा), दुसरा अक्कांचा चा अरविंद आणि तिसरा संतोषचा मोठा भाऊ अरविंद नवलकर. अक्कांचा अरविंद ५-६ रात्री जागून संक्रांति साठी धार-धार  'मांज्या' तयार करायचा - बाहेर प्यासेजच्या भिंतीला ६-७ फुटांच्या अंतरावर दोन खिळे ठोकणे, त्या भवति 'कोंबडा' छाप  सुतळीचे वेटोळे घालणे (लग्नात नवरा-बायकोला घालतात त्या प्रमाणे),  सुतळीलीस 'लुबदि' घासणे, सुतळी सुकवणे, सुकलेला 'मांज्या' फिरकीस गुंडाळणे, हा सारा खटाटोप. 'लुबदि' कशी तयार करतो हे मात्र माझ्या शिवाय तो कोणालाच सांगत नसे.  माझ्या बरोबर त्याने 'शेअर' केलेले 'लुबदि' सिकरेट असे आहे. खलबत्यात  औषधाच्या(तुम्ही scotch रिकामी करून वापरू शकता) रिकाम्या बाटल्यांचा (त्या वेळी तो दारू पित नव्हता) चुरा करणे, ५-६ अंडी, तांदुळाचे पीठ, पाणी व शिरस/लय/  चिकट गोंध (Fivicol वापरू शकता) आणि काचेचा चुरा ह्याचे चांगले मिश्रण तयार करून लगदा बनवणे (well-kneaded and well-moistened dough) आणि बनते लुबदी. कशी वाटली आमची रेसिपी? नाही, मी तुमची फिरकी घेत नाही!

दिवळीपूर्वी रात्र रात्र जागून मोठी मुले लहान-मोठी  'अनारे', आपट बॉम्ब, पणत्या असे फटाके  आणि सुंदर सुंदर आकाश कंदील बनवीत. त्या अनारातून उडणाऱ्या फुलरुपी / चांदण्यारुपी ठिणग्या (floral sparks) अतिशय मोहक वाटायच्या आणि फार उंचही उडत, सहज ३-४ मजले.  रात्र जागून कोजागरी साजरी करण्यात फार धमाल येत असे - सारे, आम्हा लहाना पासून मोठ्या पर्यंत आट्या - पाट्या खेळायचो.
दिवाळीत कमळा बाई शाळेच्या हॉल मध्ये वाडीतील मुल-मुली विविध कार्यक्रम करीत - नाटक,गाणी,वेशभूषा - बरेच काही. मला आठवते - प्रेक्षकातून प्रवेश घेत स्टेजकडे जात असलेली ती " तहान्या दुधाची र, मला लुगड भी न्हाय ---" भिकारीण झालेला कदमांचा  'BMR' अवि (त्यांच्याच ग्रुपने ठेवलेले टोपण नाव) - त्याने पहिले प्राईझ घेतले आणि समेळांचा  सुधाकर 'नाना' झाला होता 'टाकी वाली'. त्यावेळी मुलींनी (निमा,उषा,किशोरी, क्षमा) सादर केलेला  डान्स टेब्लो देखील आठवतो - फार मजा होती हो!

राम नवमीला आम्ही लहान मुले आपआपल्या दरवाज्यात 'राम-मंदिरे' तयार करायचो आणि मेहनत घेऊन आकर्षक सजावट करायचो. चाळीतील वडीलधारी मंडळी येउन प्रोत्साहन देत.

लहानपणी खेळत होतो ते आमचे खेळ
मोठ्या मुलांचे वेग-वेगळे खेळ पाहून आम्ही ते खेळ खेळू लागलो - चार भिंतीतले आणि मैदानी.
आता हे खेळ खेळताना कोणही दिसत नाही. कॉम्पुटर आणि मोबाईलच्या समुद्रात बुडून गेले आमचे सारे खेळ . खालील फोटोत आहेत सात खेळ:

  १] आसू-मासू :




  • वैयक्तिक
  • व्यक्तीविशिष्ट

  • खेळात व्यक्तीचे कौशल्य दिसते. खेळाडूंचे खेळण्याचे क्रम ठरवले जातात.  खालील आकृति आहे आसू मासु खेळाचे कोर्ट (पट) :

                                                                               #येथून  खेळाडूने पाठमोरे उभेराहून खेळास सुरवात  करणे.

    खेळाडू खुण (#) केलेल्या जागेवर उलट उभे राहून आपल्या हाताने हातातील बांगडी/ सेफ्टी पिन/ काटा (पटाच्या) कोर्टाच्या दिशेने फेकतो. पटात ७ घरे असतात. फेकलेली वस्तू आपल्या जवळील पहिल्या घरात पडणे गरजेचे असते. तसे न झाल्यास तो बाद ठरतो. आणि जर बांगडी पहिल्या घरात पडली तर खेळ पुढे चालू. पहिल्या घरात बांगडी असताना खेळाडू पहिल्या घरात पाय न ठेवता उडीमारून आपला डावा पाय दुसऱ्या आणि उजवा पाय तिसऱ्या घरात उभा राहून पुढे वाटचाल करतो. चौथ्या एक पायाने लंगडी, पाचव्यात आणि सहाव्यात एक -एक पाय  आणि सातव्यात एका पायावर लंगडी आणि लंगडीवर गिरकी घेऊन परतीचा प्रवास. ५ वे - ६ वे घर , मग ४ थे  आणि  रे ३ रे.  दुसऱ्या -तिसऱ्या घरातून वाकून बांगडी उचलणे आणि कोर्टा बाहेर उडी मारणे. मग पुन्हा तेच. पाठमोरे उभे राहून २ऱ्या घरात बांगडी. बाकी सर्व तसेच. अश्या रीतीने बांगडी अनुक्रमाने एका पासून सातापर्यंत पाडून झाल्यावर आपले घर करण्याची वेळ. उलटे उभे राहून बांगडी टाकणे . ज्या घरात बांगडी पडेल ते घर आपले. खेळ पुढे चालू. पण आपल्या घरात दोन पाय टाकण्याची मुभा, मात्र इतरांना नाही. दुसऱ्याच्या घरात कोणाला पाय ठेवता येत नाही.ठेवल्यास तो खेळाडू बाद. पटाच्या रेशेंवर पडल्यास खेळाडू बाद. सर्वात घरे जास्ती करील तो खेळात विजयी.

    २] भौरे :  




  • वैयक्तिक
  • व्यक्तीविशिष्ट

  • भौरा फिरवणे आणि त्याला नीट दोरी गुंडाळणे ही एक कला आहे. लामिनी वरून भौरा हाती(पंज्यावर) घेणे आणि तो 'हात जळी' ( दोरीनेच जमिनीवर पडू न देता आपल्या पंज्यावर घेणे) घेण्यात फार कौशल्य लागते.
    पण हा वैयक्तिक खेळ सांघिक (team game ) करता येतो. दोन संघ निवडले जातात.

    ३] लगोरी :

    ४] गोट्या :

    ५] बेचकी:
    ६] विटी - दांडू:
    ७]लपंडाव:
    ८ ] इतर खेळ : ऐस- पईस, कांदा-फोडी, सूर -सूर ( सूर-पारंब्या वरून आम्ही केलेला एक खेळ), इत्यादी.

     असू मासू हा खेळ हलीच्या मुलांना माहित नसावा. म्हणून त्या बद्धल सविस्तर लिहिले. एरंडेल तेल
    'एरंडेल तेल'  सध्या नावानेच मला अजून धडकी बसते. आमच्या घरी 'एरंडेल तेल' पाजण् याचा एक भयानक कार्यक्रम महिन्यातून एकदा तरी होत असे. त्यातून कोणच सुटले नाही - पुष्पा पासून आमच्या सर्व भाची-भाचे मंडळी पर्यंत. मी मात्र माझ्या दोन्ही मुलांना त्याची झळ लागू दिली नाही. पुष्पा आवडीने पित असे. अजूनही ती पिते. मला पिताना अंगावर काटा येत असे,  आईचे ते मला सांगणे, " मोजून दीड चमचा  देते" आणि कपात चमचा तिरका धरीत बाटलीतून 'एरंडेल तेल' घालण्यास सुरवात. अर्धा कप भरला तरी तेलाची धार चालूच - मग डोळे मिटून, नाक दाबीत कसे  बसे  तेल गिळणे! तुम्ही हे भयानक 'पेय' प्याहाला नसाल तर तुम्हाला आम्ही ह्या दिव्यातून कसे गेलो त्याची साधी कल्पना देखील करता येणार नाही.  त्या तेलाचा स्वाद - तुमच्या रुचिज्ञानकलिकाना (taste buds) गोड ,आंबट , तिकट , कडू हे स्वाद माहित  असतील. पण आणखी असतो एक स्वाद आणि तो म्हणजे एरंडेल तेलाचा - एक चमत्कारिक असा स्वाद आणि तो लपविण्यासाठी आई एरंडेल तेल वेग- वेगळ्या माध्यमातून देऊ लागली - सुरवातीला चहातून, मग झाले रॉस्बेरी - पिऊन  झाल्यावर पान- सुपारी खाऊन बघितले, पण नाही हो ती चव जिभेवरून हटता हटत नाही. पिउन झाल्यावर दिवस भर येणारे ते ढेकर  आणि पोटात होणारी ती घुर-घुर - अजूनही शहरा येतो!  माझे बिचारे भाचे-भाची, त्यांची केविलवाणी धडपड, पण आमची आई त्यांना एरंडेल तेल पाजायचीच. अजूनही ते दृश्य  माझ्या डोळ्या समोर तसेच्या तसे आहे- वर्षा, राहुल,निखिल, संजीव, आदित्य, आणि आदिती, ह्या सर्वांची रडारड, माझ्या आईच्या मांडी आणि पाया खाली घट्ट अडकीवलेले त्यांचे हात-पाय, आईने आपल्या डाव्या हाताने दाबलेले त्यांचे नाक, उजव्या हातातील टेबल स्पूनने घश्यात कोंबलेले एरंडेल तेल, तोंडातून ओंघळणारे तेल चमच्यानेच परत घशात. लहानपणी मला हे सारे अघोरीच वाटायचे. सुट्टीत मी आजी कडे राहत असे. पण तेथेही माझी सुटका नसे. महेश, अमला व पुनमला मी कसा त्यांचा एक आदर्श मोठा भाऊ आहे ते सिद्ध करण्या साठी निमूट पणे एरंडेल तेल घेणे भाग पडे. माझ्या बहिणींनी आणि मोठ्या भाची,वर्षाने हे सत्र चालूच ठेवले आहे. त्यांच्या मुलांपासून नातवंड पर्यंत. वचपा काढतात, कोण जाणे? एकदा माझ्या सुनेने मला विचारले, " My dad said that I should give castor oil to Sarah. My mother used to give me during my childhood. Baba, should I?"  मी खेकसूनच म्हणालो, " No! Don't ever! Keep Sarah away from castor oil." आई सांगत असे, " तुम्ही सारे एरंडेल घेण्यास मला फार त्रास देतात. पण सेन्जीत कुटुंबात सारे कसे आवडीने घेतात. मधु, बाबू, चंदू आणि अनाबाळ मध्ये तर नेहमी चढाओढ असते 'कोण शेवटचा चमचा चाटणार?' मग अनुबायची (अनु मावशी) मुलं - पदु , इंदू , मंगल, नीना -  त्या चढाओढीत भाग घेतात." असेल ही. ते सारे आवडीने घेतही असतील. पण त्यांची मुले, नातवंडे, पतवंडे घेत असतील का? कोण जाणे? मात्र अनुमावाशीच्या एका पणतीने, माझ्या मावज भाऊ किरणची मुलगी समीराने नक्कीच एरंडेल घेतले नसावे. 

    विनय त्रिलोकेकर
      

    Some comments received on Face Book:

    • ARCHANA SOPARKAR:LOL mama.. Lahanpani agdich kamatun gelele hotat tumhi lok! Pan ashi maja nasti keli tar aaj evadhya chhan memories pan nastya..                                                                          on  July19, 2013

    My reply: How very true! That's the only reason that I like to retain some of my childhood traits. But then---घरी  कामचुकारपणा  अजूनही मी करतो, त्यामुळे तुम्ही सारे म्हणतात ' बिच्चारी मामी!'

    No comments:

    Post a Comment