Saturday, 23 July 2016

फुल टाईम जॉब - पार्ट टाईम छंद आणि घडला एक चित्रकार, बिजयानंद बिसवाल (Bijayanand Biswal)

 फुल टाईम जॉब - पार्ट टाईम छंद आणि घडला एक चित्रकार, बिजयानंद बिसवाल (Bijayanand Biswal)

स्टेशन धर्मपूर , हिमाचल . "तिकीट प्लिज" काहीशा नाराजीतच आपली तिकिटे टी.सी. च्या हातात सोपवीत आपले सामान ढकलत तो इसम घाईत स्टेशना बाहेर पडला. पांढरी पॅन्ट - काळा कोट - युनिफॉर्म मधील त्या तिकीट चेकर कडे त्या इसमाने फारसे लक्ष देखील दिले नाही, त्याचा चेहरा पाहिला नाही किंवा त्याच्या कोटावरील असलेली  नेम प्लेट वाचली नाही. तेंव्हा टीसीचे नाव तो कसे जाणणार ? पण नावात काय आहे? मात्र त्या तिकीट चेकरला हे सारे 'रुटीन' होते. त्याच्या फुल टाईम जॉबचा एक भाग होता. दिवस भरातील आपल्या  ह्या ८ तासांच्या नोकरीत त्याने अनेकांना हटकून त्यांची तिकिटे तपासली असावीत आणि अनेकांना दंड / 'फाईन' भरण्यास भागही पाडले असावे. वर्षा मागून वर्ष लोटली. कोळशाचे इंजिन जाऊन डिझेल- इलेक्ट्रिकची इंजिने आली. धर्मपूर झाले, कानपुर झाले आणि नागपूर झाले. अनेक बदल्या झाल्या. बढती - प्रमोशन मिळत गेले आणि ते झाले 'चिफ तिकीट इन्स्पेक्टर'. हे सर्व घडत असताना ते आपला एक छंद जोपासत होते. कामाच्या वेळे नंतर ८-९ तासांचा वेळ ते  आपल्या छंदाला देत. आणि घडत गेला एक असामान्य चित्रकार. रेल्वेच्या ह्या सांसारिक, धकाधकीच्या आणि गोंधळाच्या दुनियेत एक उत्कृष्ट चित्रकार जन्माला येईल असे कोणाला वाटले देखील नसेल. कदाचित आपल्याही त्यांनी हटकले असेल. आपल्या तिकीटाची तपासणी केली असेल. पण आपणालाही त्यांचे नाव माहीत नसेल. अहो, नावात काय आहे?

बिजयचे संपूर्ण नाव बिजयानंद बिसवाल असे असले तरी लहानपणी सर्व त्याला बिजॉय,बिजय, बिजू, बिज्या असे हाक मारीत असतीलही. आपल्या 'मनकी बात' मध्ये पंतप्रधान मोदीजींनी बिसवालांच्या नावाचा उल्लेख केला आणि लोकं त्यांच्या कामांची दखल घेऊ लागले आहेत. आज ते उत्कृष्ट चित्रकार म्हणून ओळखले जातात. मी खात्रीने सांगतो की तुम्ही त्यांची चित्रं पाहाल तर ती सारी चित्रं नक्कीच 'शेअर' कराल! असो.


बिजयचा जन्म ओरिसातील अंगुल जिल्हातील पल्लाहरा गावात झाला. त्यांचे वडील एक लहानसे व्यापारी होते. त्यांना ३ भाऊ आणि १ बहीण. त्यांचे शालेय शिक्षण एका शासकीय शाळेत झाले. एका मुलाखतीत ते म्हणतात ," चित्रकलाही एक दैवी देणगी आहे. कलेतील आपले कौशल्य शिक्षणातून जरूर वाढवता येते, पण हाडाचा कलावंत होण्यासाठी (true - blue artist), कलेतील बारकावे ओळखणे आणि त्यांतील वेगवेगळे विषय समजण्यासाठी तुम्हाला चित्रकार म्हणून जन्मच घेणे आवश्यक असते !"

त्यांचा हा प्रवास लहानपणीच घरातील भिंती आणि जमिनीवर कोळश्यानी किंवा खडुनी एखादे चित्र रेखाटणे आणि आईच्या मातीच्या चुलीवर राखेने फुल-पानांची सुरेख कलाकृती तयार करून सुरु झाला. जमीन-भिंतीं कॅनवास म्हणून आणि चारकोल रुपी पेंट ब्रश वापरणे हेच फक्त परवडत होते. त्यांना वयाच्या २०व्या वर्षी पहिली रिंग पेटी मिळाली.

 सुरवातीला केवळ अनुभवासाठी, विरंगुळा म्हणून आणि निर्मळ आनंद मिळवण्या करीता शाळेतील शिक्षकांच्या तस्विरी (portraits)  ते तयार करू लागले, सोबत घरा जवळ असलेल्या सायकल स्टोर्स साठी पाट्या बनवणे हे उद्योग चालूच होते. व्हिडीओ पार्लर साठी अमिताभ बच्चन आणि रेखाचे पॉर्टरेट झाले आणि शेवटी मासिकां करिता इलस्ट्रेशन पाठवू लागले. एका मुलाखतीत ते म्हणतात, " मला माहित होते की मला अशा नोकरीची गरज होती की त्या जॉब मध्ये कोणत्या प्रकारचा ताण (stress) नसेल आणि भारतीय रेल्वे एम्प्लॉयर म्हणून माझ्यासाठी आदर्श ठरले. मी रेल्वेत अलीकडे मुख्य तिकीट इंस्पेप्टर म्हणून काम करतो. काम सांभाळून सवडीने माझ्या कलेची जोपासना करू शकलो. येथे माझ्या गुणांना भरपूर वाव मिळाला. आणि म्हणूनच माझ्या बहुसंख्य  चित्रांत रेल्वे स्टेशन हा विषय प्रामुख्याने जाणवेल."

 त्यांचे पहिले चित्र 'बटपरा चे स्टेशन' जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये प्रसिद्ध झाले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांचा लौकिक  वाढला. आणि म्हणून त्यांनी ही 'रेल्वेची' मालिका चालू ठेवण्याचा निश्र्चय केला. त्या चित्रात दोन साधू चित्रित केले होते. अंधश्रद्धा म्हणा किंवा त्यांचा भाबडा विश्वास म्हणा त्यांच्या अनेक चित्रात एखादा तरी  साधू  'my good luck charm' (त्यांच्याच शब्दात) चित्राच्या कानाकोपऱ्यात  दिसू लागला. आणि ह्या रेल्वे प्लॅटफॉर्म श्रेणीत 'ओला चिंब प्लॅटफॉर्म' हा त्यांचा हॉलमार्क. बिसवाल ह्यांना तसे लहानपणापासून पाण्याचे फार आकर्षण. इतर भाऊ घर जवळ असलेल्या  तलावात पोहत तर बिजय चक्क नदीत पोहत असे आणि एकदा तर तो बुडणार होता.  ते म्हणतात, "आपल्या कोरड्या व धुळीच्या देशात 'पानी सुकून देता है ', मला पाण्यातील प्रतिबिंबाचे चित्रीकरण करायला फार आवडते. पाऊस प्लॅटफॉर्मचा आरसा (liquid mirror) बनवतो. लोकांची ती धडपड, प्रत्येकांची देहबोली (Body Language), त्यांचा तो भारतीयपणा , त्यांचे वेग-वेगळे lलहान -मोठे सामान, ह्या सर्वांचे चित्र काढण्यास मला आवडते आणि अतिशय आनंदही  मिळतो."

ऍक्रिलिक पेंटच्या माध्यम वापरण्याच्या मोहात ते २००० च्या सुरवातीला पडले. त्याचे मुख्य कारण ऑईल पेंटिंग सुकण्यास तब्बल २० किंवा त्याहून अधिक दिवस लागतात आणि हे त्यांना आवडत नाही. ते अजून वॉटर कलरची कलाकृती करतात. "अर्थात ऑईल किंवा ऍक्रिलिक प्रमाणे ती जास्त विकली जात नाहीत. पण त्यात तुम्हाला एक आर्टिस्ट म्हणून 'एक्सपेरिमेंट' करण्यास भरपूर वाव मिळतो. आपण कोठेही जाऊन एखादे स्केच पॅडवर वॉटर कलरने पेंटिंग करू शकतो. ऍक्रेलिक साठी फळा व लाकडी चौकट (easel), तसेच बाहेरील हवामान परिणामकारक असते - ऊन आणि वारा  पेंटिंगला लवकर सुकवून  टाकतो, तेंव्हा ऍक्रिलिक आणि ऑईल पेंटिंग  स्टुडियोतच  ठीक."












ते म्हणतात, " मी अतिशय भाग्यशाली आहे. आज मीडिया आणि जनसंपर्कांमुळे माझे काम अनेकांना माहीत झाले. हे सारे माझ्या कल्पने पलीकडचे आहे. मी नुकताच रशियातून परतलो. मला एका प्रदर्शना करिता आमंत्रित केले होते. माझी १५ चित्रं तेथे प्रदर्शित केली गेली. टीव्ही वर माझ्या बद्धल सांगण्यातही आले.(अर्थात काय सांगण्यात आले ते मला समजले नाही.) बी बी सी वर मुलाखत झाली. प्रदर्शना निमित्त मी बराच प्रवास करतो. वारंवार होणाऱ्या प्रवासामुळे केवळ कल्पनेनेच  कोणताही आणि कोठेही असलेल्या प्लॅटफॉर्मची चित्र मी माझ्या डोळ्या समोर उभे करू शकतो. त्यासाठी तेथे जातीने असण्याची गरज भासत नाही. प्रत्येक कॉलम, इलेक्ट्रिक पोल , गाडीची नेमकी जागा - हे सारे माझ्या डोळ्या समोर येते. "

ही सारी होती रेल्वे मालिकेतील चित्रं  . मी एक सामान्य माणूस आहे. मला चित्रकलेचे फारसे ज्ञान नाही. चित्रांचे रसग्रहण (critical appreciation) मला जमणार नाही. पण ही सारी चित्रं मला जिवंत, कॅमेऱ्यांनी टिपलेल्या फोटो सारखी (so photo-realistic) वाटतात. चित्रातील रेखीवपणा, बारीक-सारीक तपशील (प्लॅटफॉर्मच्या छपरावर लटकत असलेले स्पिकर्स,दूर टोकाला दिसणारे सिग्नल्स आणि  कॅंटीन स्टॉल,इंडिकेटर ,दूर पुसट होतचाललेला देखावा, रुळावर काम करणारे रेल्वे कर्मचारी, प्रत्येक प्रवाश्याचे बारकाईने केलेले चित्र वर्णन - दोन युविका एकाच छत्रीत आणि त्यांची स्वतःला सांभाळू की छत्रीला सांभाळू अशी स्थिती, साडी थोडी वर सारीत ओल्या प्लॅटफॉर्म पार करीत असलेली महिला, दूरवर दिसत असलेला बॅकग्राउंड देखावा, ओव्हर-हेड वायर्स, पाठीमागे दिसत असलेला रेल्वे पूल, मोर पक्षी,  ), सारे काही मोहक वाटते.पाण्यात पडलेली प्रतिबिंबं खरीखुरी वाटतात - अँगल ऑफ रिफ्लेक्शनची जाण ठेऊन सारी चित्रं रंगवली आहेत. प्रत्येक चित्र आपल्याला जवळचा देखावा ठळक दाखवत दूरवर नेते आणि पुसट होतगेलेले  दृश्य दूरदूर जात नाहीसे होईल असे वाटते.

आणि ही पहा  इतर काही पेंटिंग: आकाशातील काळे ढग वरील चित्रात आपण पाहिले तसेच पाण्यानी ओला झालेला परिसर आणि त्या मुळे दिसणारे प्रतिबिंब. खालील काही चित्रात ऊन आणि सावल्यांचे सुंदर देखावे दिसतात.



वरील चित्रात रॉनाल्डोचे व्यक्तिचित्रण अप्रतिम वाटते. खालील चित्राला त्यांनी नाव दिले आहे ' Chip off the old block'.१६ x २२ इंच हॅन्ड मेड पेपर वर वॉटर कलरने केलेली एक कलाकृती. ह्या चित्रा बद्धल ते म्हणतात, "Portrait of the tree that offers me shadow on my roof terrace that doubles up as my studio. I picked one of its dead branches as my subject. The peeling dead trunk ( no more now )offered itself as a perfect model when I was going through one of those “painter’s block..the work turned out nice and got sold too..!"


इंटरनेट मुळे आपल्या अशा काही व्यक्तिंची प्रत्यक्ष न भेटताच  ओळख होते. आणि आज माझी ह्या आगळ्या वेगळ्या चित्रकाराशी भेट झाली. नवीन पिढीला काय संदेश? त्यांचा खरेपणा आणि विनयशीलता त्यांच्या उत्तराने जाणवतो.

"I am not competent enough to give any message. All I would like to say is that we should never let our hobbies die. Pursue your passion with zeal. They will motivate you to work harder and lead a happy life."

                                                                                                 विनय त्रिलोकेकर
















No comments:

Post a Comment