Friday, 22 June 2018

मटण मुघलाई मसाला

तसा माझा आणि किचनचा संबंध केवळ खाण्यापुरताच होय. कुकिंग मध्ये उगाच ढवळाढवळ कशाला! पण अधून  मधून मला बायकोला मदत करण्याची लहर येते. (मदत म्हणजे काय, तुम्ही विचाराल. लागणारे साहित्य आणि कृती वाचून दाखवणे. "ह्याला काय मदत म्हणतात?",तुमच्या मनांतील प्रश्न अचूक ओळखला. मोजमाप काटेकोर पाळते की नाही - अमुक एक वस्तू - ४ असेल तर चारच, कमी जास्त नाही. केवढे मोठे काम , नव्हे का?) असो.

पर्वा मी बायकोला मटण मुघलाई मसाला तयार करण्यास मदत केले. असे मनांतल्या मनांत हसू नका. डिश स्वादिष्ट झाली हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अनायासे जेवत असतांना मावस बहिणीची सून आली होती. तिला थोडे चाखण्यास दिले. " चांगले झालाय...... " पुढे काय होणार हे मला माहित होते - नेहमीचेच  - रेसिपी करिता माझ्या कडे कागद (वहीचे पान ) पेन मागितले जाणार. वही शोधणे, पेन सापडले तर त्यांतील रिफील संपलेली मग पेन्सिलच्या शोधात फास्टर फेणे सारखे जाणे आणि पेंसिलीचे टोक तुटले म्हणून शार्पनर साठी बॅग मध्ये हात घाले आणि हाताला काय लागेल त्याचा नेम नाही ... मग हा सारा खटाटोप करण्या पेक्षा, मी तिला वोट्सऍप वरून ही रेसिपीच पाठवली:






मटण मुघलाई मसाला 
साहित्य:
  1. मटण - १ किलो 
  2. हिरव्या मिरच्या - ६
  3. बारीक कापलेली कोथिंबीर - १० चहाचे चमचे + वरून भिरभिवण्या साठी
  4. काश्मिरी  मिरच्या - १०
  5. दालचिनी - ४ से. मी. 
  6. मसाला वेलची - २
  7. साध्या वेलची - ६
  8. लसूण - ६ पाकळ्या 
  9. लवंग - ५ 
  10. धणे - ८ चहाचे चमचे
  11. जिरे- २ चहाचे चमचे
  12. कांदे - ४ कप चौकोनी तुकडे 
  13. काळे मिरी - १५
  14.  हळद -३/४  चहाचा  चमचा 
  15. मीठ - ४ चहाचे चमचे
  16. दही - १ कप 
  17. बारीक तुकडे आल्याचे  - २ चहाचे चमचे
  18. साजूक तूप ( डायनॅमिक्स Dynamix Cow Ghee )-१/२ कप [ ह्या तुपाची जाहिरात करण्याचा हेतू मुळीच नाही - उगाच गैरसमज नको.]
कृती:
  1. ४ टेबल स्पून तुपात मटण तळणे, मटणाचा  रंग तांबूस होईस तोवर.  तळलेले मटण बाजूला ठेवणे. 
  2. हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घेणे. 
  3. काश्मिरीरी मिरच्या १० ते १५ मिनिटे पाण्यात भिजवून नंतर त्यांचे बारीक तुकडे करावेत. 
  4. दालचिनीचे बारीक तुकडे करावेत. 
  5. हे सारे एका ड्राय ग्राइंडर[ INALSA किंवा Sumeet Grinder - प्रचार करीत नाही, लक्षात असू द्या .] मध्ये घ्याव.  जिरे व सोललेल्या लसणाच्या पाकळ्या घालून सारे बारीक दळून घ्या.  
  6. त्यांत कांद्याचे काप (अर्धे ) घालून बारीक वाटा. मग उरलेला कांदा आणि बाकीचे मसाले घालून मिक्सर २५  सेकंद चालवणे आणि नंतर सर्व मसाला  खाली करून , मिक्सर २५  सेकंद २ च्या गतीने चालवून मसाला ढवळून एकजीव करून घेणे. 
  7. वाटलेला मसाला तुपात तांबूस होइस तोवर भाजून घेणे. त्यांत दही (फेटलेले) घालणे. भाजणे तूप सुटे होइस तोवर  ठेवणे.
  8. त्यांत मटण , ३/४ कप पाणी व मीठ घालणे. 
  9. कुकर मध्ये शिजवावे. 
  10. कोथिंबीर वरून भिरभिने . 
  11. पाऊस सुरु असल्यास व्हिस्कीचे ग्लास आणि पाऊस नसल्यास बियर पुढ्यात ठेऊन मटण मुघलाई मसाल्याचा   आस्वाद घ्या. 
  12. आणि विनयमामा व विद्यमामी ह्यांना कंपनी म्हणून अवश्य आमंत्रण देणे                              अनेक आशीर्वाद,                                                                                   विनय मामा 

1 comment:

  1. छान जरूर बनवून पाहिन. धन्यवाद

    ReplyDelete