Sunday, 15 November 2015

तुफान मेल, ही दुनिया एक तुफान मेल!



तुफान मेल, ही दुनिया एक तुफान मेल!

काही दिवसापूर्वी माझा एक मित्र बऱ्याच वर्षांनी दादर स्टेशन बाहेर भेटला. जवळच असलेल्या इराणी हॉटेल मध्ये आम्ही शिरलो. आमचा तो अड्डा असे. ऑर्डर दिली , चहा झाला आणि खाता  - खाता गप्पा सुरु झाल्या. गजाने मला विचारले, " आपण येथे कितेकदा आलो आहोत. खुर्च्या - टेबले तशीच, चहाचा स्वाद तोच आणि खिमा-पावची चव पण तीच. व्हॉट इज मिसिंग?" " जूक बॉक्स !" आम्ही दोघेही एकदम ओरडलो. .

 
 जूक बॉक्स वरून गाण्यांचा विषय सुरु झाला. गजा = गाणी, हे एक समीकरण आहे. गजाचे गण्या बद्धलचे ज्ञान दाणगे - सिनेमात गाणे कोणाच्या तोंडी, पाश्व गायक कोण, संगीतकार कोण, गीतकार कोण, चित्रपट कोणता - हे सारे अचूक सांगतो. जुन्या आठवणींची उजळणी झाली. गप्पा रंगू लागल्या.

 धाड- धाड करीत, शिटी वाजवीत कोण एक गाडी स्टेशनात शिरत होती. गजा गाणे गुण- गुणू लागला,             " तूफान मेल, दुनिया यह दुनिया तूफान मेल l --- सभी मुसाफिर बिछड़ जाएंगे पल भर का है मेल तूफ़ान मेल दुनिया यह दुनिया तूफ़ान मेल l"





बाजूच्या टेबलवर काही तरुण मंडळी होती. फारच घाईत होते. सारखे, " टाईम नही है मेरे पास l ", " फुर्सत नहीं" "नो टाइम " असे एकमेकांना सांगत होते.  आणि गजा गुण -गुणत असलेले गाणे अर्थपूर्ण वाटू लागले. जीवन तुफान मेल सारखे झाले आहे - फास्ट. ह्या वेगवान जीवनामुळे आपण स्वतःला विसरू लागलो आहोत. स्मार्टफोन सारख्या उपकरणा मुळे आपल्याला आयुष्यातील लहान लहान आनंदाच्या क्षणाचा विसर पडू लागलाय. भेटीगाठी  हळू हळू बंद होऊन. त्या जागी  भावना विरहित एस एम एस (sms ). ईमेलमुळे पत्रलेखनातील श्रीमंती आणि गोडवा आपण वसरलो आहोत. गप्पांमधून होणारे हास्यविनोदा पासून वंचित झाल्याने आपण सतत काळजी करणारे किंवा दुसऱ्यांचा हेवा करणारे प्राणी बनलो आहोत. 

मला आठवते आम्ही, मित्र असो किंवा सहकारी, बऱ्याचदा भेटत असू, गप-शप करत असू. हास्य विनोद होत आणि वादही होत. वाद व्यक्तिमत्वावर  नसत तर ते तत्वावर असत. आमची मत भिन्न असत, आम्ही एकमेकांना विरोध करत असू पण आम्हाला एकमेकांचा आदरही असे. सुरूवाती -सुरूवातीला गाठी भेटी चहा- कॉफीचे घोट घेत घेत रंगत असत. नंतर कपाचे रुपांतर ग्लास मध्ये झाले आणि चहा- कॉफी सोडून आम्ही बियर, रम किंवा विस्कीचे घोट घेत घेत गप्पा मारू लागलो. आमचे आणि आमच्या गप्पा गोष्टींचे असे प्रमोशन होत गेले, पण त्यातील गोडवा कधीच आटला नाही. 

पण ह्या धावपळीच्या जीवनात आपण सारे घडत असलेले क्षणच जगू लागलो आहोत. घोषणा बाजीत वेळ दवडूलागलो आहोत. अर्थपूर्ण संवाद विणणे हेच मुळात विसरलो आहोत. आता आपली सायंकाळ सूर्यास्ता बरोबरच संपते. पूर्वी प्रमाणे आपण जुन्या आठवणीच्या आनंदात रेगाळू शकत नाही. ज्या वेगाने लिहिण्याची कला नष्ट होत आहे तितक्याच वेगाने संवाद साधण्याचे कौशल्य आपण हरवून बसलो आहोत. ह्या दोनही गोष्टी साधण्या साठी तल्लख बुद्धी पेक्षा मोकळे आणि स्वच्छ - निर्मळ मन असायला लागते. पण आज आपल्या साऱ्यांच्या डोक्याचे झाला आहे विचका. 

 पण 'आजचा दिवस माझा' असे म्हणत आयुष रेटण्यात काय मजा आहे? एक एक  घडणाऱ्या क्षणचा   आनंद उपभोग घेण्यातच गंमत असते! आपली धावपळ थोडी कमी करूया. आपल्या तुफान मेलचा वेग मंद करूया. स्वप्रेरीत आणि  स्वाभाविकपणे पुनः नाचूया! मनमोकळ्या पणाने हसुया , आपल्या आप्तेष्टा आणि मित्र परिवारांबरोबर वेळ घालवूया आणि आठवणीना उधाण देऊन आनंद लुटुया.



                                                                                      विनय त्रिलोकेकर

2 comments:

  1. सुंदर लिखाण. आज ही काही लोकं आयुष्य रसमय जगताहेत

    ReplyDelete
  2. Very true. Today people have many devices to remain connected but the internal connection is lost.

    ReplyDelete