Monday 22 July 2013

माझा एक प्रवास

माझा एक प्रवास

२ ० ० ४ साली, वयाच्या ५ ८ व्या वर्षी मी मोठ्या औषधाच्या कंपनीतून सेवानिवृत्त झालो आणि लगेचच एका एन. जी. ओ. मध्ये काम करू लागलो. आमची संस्था उपेक्षित वर्गातील मुलांसाठी काम करते, त्यांचे शिक्षण व त्यांचे आरोग्य. अलीकडेच (नोवेम्बर ,२ ० १ २ ) मी तेथले  काम सोडले, सोडले म्हणण्या पेक्षा मी  टेम्पररी ब्रेक घेतला आहे असे म्हणा ( ३ महिने सौदीला, मुला कडे जाऊन आलो). सुरवातीला मी एक शिक्षक (इंग्रजी शिकवण्यास) म्हणून लागलो. टीचर - मेनेजर एजुकेशन व संसाधन पिढी  (Education  & Resource Generation Manager )  ते संस्थेचा ऑथोराईस्ड सीग्नेटरी - ही माझी वाटचाल महत्वाची नाही. पण तेथे  मी अनुभवल्या काही  हृदयस्पर्शी  गोष्टींचा मला विसर पडत नाही. आणि त्याचं मी लिहित आहे.


  •   गणेशसाठी केलेली धडपड 

बऱ्याचदा  यश- अपयशाच्या तसेच सुख- दुखाच्या गोष्टी रुक्ष आकडेवारीत लिहिल्या जातात - घडून झालेले, पूर्ण चित्र आपल्या समोर ठेवले जाते. पण पडद्या पाठी नक्की काय घडलें असेल? घटनेतील छोटे मोठे पैलू? 'Behind the scene' काय घडले असावे? भरपूर काय घडत असते हो. पण ते कधीच सांगितले जात नाही. आमच्या संस्थेतून लाभ घेत असलेला गणेश, अतिशय हुशार आणि अभ्यासू होता, अचानक आजारी झाला. आजार वाढत गेला, त्याला हॉस्पिटलात ('इस्पितळ' हा शब्द मला बरोबर वाटत नाही, असो!) ठेवण्यात आले. त्याला ल्युकेमिआ (रक्ताचा कर्क रोग) झाला होता. लहानपणीच त्याची आई वारली होती. वडिलांनी दुसरे लग्न केले. सावत्र आई गणेशला वाईट वागवू लागली आणि जेंव्हा तिला स्वतःचा मुलगा झाला तेंव्हापासून गणेशकडे फार दुर्लक्ष झाले, त्याची आबाळ होऊ लागली.  आजारी गणेशची सुश्रुषा करायला नको म्हणून सावत्र आई आपल्या लहान मुलाला घेऊन माहेरी, गावाला पळून गेली. वडीलाने गणेशला हॉस्पिटलात टाकून आपले हात झटकले, त्याला आपल्या निशिबावर सोडून. आमच्या मेनेजिंग ट्रस्टी (Managing Trustee), संस्थेचे इतर - कम्युनिटी कामगार, शिक्षिका, मेनेजर, ह्या सर्वांनी गणेश्वर प्रेमाचा व  आस्थेचा वर्षाव केला. त्याच्या कडे जातीने लक्ष देत होते. अनेकांनी मदतीचा हात पुढे केले, साऱ्यांनी आप आपल्या परीने. डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉईज त्याला बरे करण्या साठी झटत होते. पण त्याची प्रकृती खालावत चालली होती. त्याला आपल्या लहान भावास ('सावत्र' हे  त्याच्या निरागस मनाला माहित नव्हते, ते त्याच्या डिक्शनरीत नव्हते) भेटण्याची इच्छा झाली. तो मरणाच्या दारात होता. आमची एक कम्युनिटी वर्कर सावत्र आईच्या गावी जाऊन त्यांना घेऊन आली. गणेशने आपल्या भावास घट्ट मिठी मारली आणि प्राण सोडले.


  •  मनेश, एक अपूर्ण कहाणी!

मनेश दुपारी चंदन वाडीतील B. M. C. शाळेत  जात असे आणि सकाळी आमच्या संस्थेत येत असे. तो ७ वीत होता. तो  होता हुशार आणि अभ्यासूपण. माझ्या इंग्रचीच्या वर्गातच नव्हे तर इतर विषयांच्या तासातही तो फटाफट उत्तर देत असे. तो नियमित आणि वक्तशीर होता, शाळेत किंवा आमच्या कडे क्वचित गैहजर राहायचा. गणपतीची चार दिवसाच्या सुट्टी नंतर आमचे वर्ग परत  सुरु झाले. वर्गात मनेश दिसत नव्हता. आम्हाला काळजी वाटत होती. वाटले गावी गेला असेल. पण मग तो आजारी असल्याचे एका शिक्षिके कडून मला समजले. मी तो कोठे रहातो हे विचारले असता तिच्या कडूनच त्याचा पत्ता मला मिळाला. दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी जाण्यास मी निघालो. आणि मग---

आज रविवार  आहे. आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरलाय. किती हा अंधार! Dark and gloomy! कोणत्याही क्षणी पाऊस कोसळणार आहे. टॅक्सी पकडली पाहिजे
काळबादेवी मुख्य रस्त्यावर येतो .  " भैया बस,  रोको यहाँ। मै यहाँ सिग्नल पर उतरता हूँ।"
बाजूच्या गल्लीच्या नाक्यावर पाटी आहे 'वसंत वाडी'! डावीकडील इमारत - होय मनेश येथेच रहातो. मी लहान मुलाच्या आतुरतेने जिना चढू लागतो. पहिला मजला, दुसरा, तिसरा मजला --- सारी दारे बंद, दारावरील पाट्या अंधुक प्रकाशातही वाचता येतात  ---'मेहता आणि को', 'Shah Enterprises', 'विजय सेल्स'---सारे उधोगिक गाळे. वैतागून मी खाली येतो. मी दुसऱ्या बिल्डींग कडे वळतो. बोर्ड वाचतो बिलिंग नंबर ४१३. 
नशीब माझे! तळ मजल्यावर कोणीतरी राहते वाटते! मी विचारतो, " महेश कहाँ रहता है?"
खोलीतून उत्तर येते, " पुरे गली में मनेस  ऐसा कोई नहीं। ए रमेस, बराबर छे ना? आप्रो गलीमा मनेस --"
" हाँ माँ, छे। आप्रो कामवाली बायनो छोकरो। हाँ साहेब, दुसरे मालेपर," बाहेर येउन तिच्या मुलगा मला सांगतो.
माझा शीण आहे कोठे? मी एकावेळी दोन पायऱ्या घेत जिना चढू लागतो. माझे हे असेच आहे, उत्साहात मला माझ्या वाढत्या वयाचे ध्यान राहत नाही आणि मी लहान मुलाच्या जोमात काही करतो. पहिल्या मजल्यावर मघा प्रमाणे काळोखच आणि दारेही बंद. मी थांबतो, काळोखामुळे की माझे वय? थोडा विसावा घेऊन वर जातो. दावीकडे एका आलिशान अपार्टमेंटचे सताड उघडे दार दिसते, दारात उभा असतो  एक सडपातळ माणूस. "कौन चाहिये आपको?" दारातूनच मला  विचारतो .
"मने--" मी विचारण्यास तोंड उघडतो. 
माझ्या उजवी कडून आवाज येतो, " .It’s Sir! आपले इंग्रजीचे सर आहेत, दादा! "
 मी टाचांवर गिरकी घेत आणि मान वळवून  आणि बघतो. एक गोजिरवाणा  चेहरा एका जाळीच्या बंद दरवाज्यातून  (collapsible door)  माझ्याकडे पहातोय
" दादा, बघ! तुझे आणि माझे सर! आपल्या घरी आले आहेत," तो आनंदाने ओरडत आहे.  
 आता त्याचा चेहरा मला नीट दिसतो, " अरे वा! तू मनेशचा धाकटा भाऊ, अकशय, बरोबर?"
"होय, सर!,"  लोखंडी दरवाजा सरकवीत मला आंत येण्यास सांगतो. 

मनेश मला पाहून लगबगीने माझ्यासाठी जमिनीवर एक गोणपाट पसरतो. मला खुणेने बसण्यास सांगतो
बसताच क्षणी लक्षात येते की ही बैठक एखाद्या मुलायम लेदर / फोम डनलोप सोफ्या पेक्षा आरामशीर आहे. मी सभोवताली पाहतो. समोर माझ्या पासून एक फुटाच्या अंतरावर एक लोखंडी कपाट. माझे पाय सरळ केल्यास कपाटावर नक्कीच आपटणार, माझी खात्री आहे.
" ह्यांत आमचे कपडे ठेवतो," मनेश मला माहिती देतो
कपाटाच्या डावीकडे एक बंद दार, ज्याच्या पुढे रचले आहेत स्टेनलेस स्टीलची, तांबा-पितळेची आणि हिंडालियमची लकलखित घासलेली भांडी आणि चकाकणारी घासलेटची चूल. माझे डोळे उजव्या बाजूस जातात, मानेशची नजरही त्याच दिशेत फिरते. बंद दारावर पाटी, 'Tec – Med – Devices'
" ते सर्व डॉक्टर आहेत," कशय पुटपुटतो." नाही, हे सारे लोक, डॉक्टरांना लागणाऱ्या वस्तू बनवतात," मनेश पुस्ती जोडतो. माझी नजर पुढे सरकते--- हे काय! अजून एक कोल्यासिबल दार! दारा मागे दिसतात कॉरुगेटेड पुठ्याचे बॉक्स, बॉक्स फाईल्स, चपट्या फाईल्स आणि मोठ-मोठाल्या पिंपांचे व ड्रमचे ढीग. पलीकडे अर्धवट दिसणाऱ्या खिडकीतून दिसतो बाहेर पडणारा रिप रिप पाउस, जणू आंतील विषण्णता आणि केविलवाण्या परिस्थितीचे एक प्रतिबिंबच असावे. माझे निरीक्षण चालूच, माझ्या पाठी उजव्या बाजूस बंद दरवाज्यावर पाटी - ' RAJESH CHEMICAL COMPANY'
"आज रविवार आहे म्हणून कंपनी बंद आहे. बरे झाले, नाहीतर आपल्याला आजही ते नकोसे वाटणारे विचित्र वास घ्यायला लागले असते," मनेशची रंनिंग कॉमेन्टरी चालूच! "रासायनिक कंपनी," 
शेजारीच आहे 'MR. SURESH  JAIN  & SONS - CHARTERED ACCOUNTANTS ' चे ऑफीस मग येतो मी आत शिरलो तो दरवाजा. हे झाले, मी बसलो आहे ती लहान जागा, त्यांचे ३ फुट रुंद  x ८ फुट लांब असे घर-  दोन बाजूला ऑफिस आणि त्या मध्ये एक अरुंद वाट - एक कॉरीडोर! आणि ते सुद्धा फक्त रात्री १० ते सकाळी १० म्हणजे केवळ बारा तासांचे घर, सोमवार ते शनिवार, शनिवार रात्री १० ते सोमवार सकाळी १० तेवढा विरंगुळा

मनेशची आई आजुबाजूची धुणी- भांडी, जागा कचरा करून घरी आली आहे. काहीं कडे ती पोळी भाजी करते हे मला माहित आहे. "नमस्ते!"  मनेशची आई नमस्कार करत विचारते, "आपण?"
" अग आई, ओळखल नाहीस ह्यांना? हे आमचे इंग्रजीचे मास्तर. तू भेटली होतीस मी ६ वी असताना."
" हं! आता ओळखले. मनेश आजारी होता हो. भर गणपतीत. आता ठीक आहे तो. उद्या तो येईल."
" बरे, पण चांगला बारा झाला असेल तरच पाठवा. उगाच घाई करू नका. पण मला एक सांगा, तुम्ही सारे येथे, ह्या जागेत आलेत कसे ? मला समजली आहे तुम्हची येथील एकंदरीत परिस्थिती."
" आम्ही सारे मालाडला राहत. छान चालले होते. आमचा हा मोठा, मनेश बालवाडीत होता. छान अभ्यास करायचा तेंव्हापण. अ  ते ज्ञ, क, का,कि-- सर्व कसे स्वछ्च आणि सुरेख. आणि हा छोट्या 'मा' 'बा' 'दे' बोलू लागला होता. सर्व आनंदात होते. आणि मग एके सकाळी,' मेला वाईटच दिवस तो, आले ते मुलसीपालटी वाले बीयमसीचे लोक हातोडे आणि मशिनी घेऊन-- तोडून टाकले, जमीनदोस्त केले आमचे घर, मिटवून टाकले सारे. म्हणाले बेकायदेशीर होते आमचे घर आणि सारी वस्ती. म्हणाले दुसरी जागा मिळणार. ह्याला भेट त्याला भेट, बरीच वणवण केली. वर्ष दोन वर्ष छता शिवाय राहिलो. मनेशची शाळा सुटली. डोक्यावरच्या छप्परा साठी मुंबईभर फिरलो. आणि आलो येथे ९० साली. जागा लहान,पण डोक्यावर छत आहे ना! रात्री झोपण्यास जागा. सकाळी ऑफिसे चालू होण्या अगोदर बाहेर जाययचे आणि ती बंद झाल्यावरच परत घरी. रात्रीचे १० - १०/३० वाजून जातात आणि त्या नंतर जेवण करणे, भांडी-कुंडी करणे, ह्यांचा अभ्यास वगैरे आटपून मध्यरात्र उलटतेच. त्यात बरे मनेश हुशार आहे. छोट्या मात्र करतो काहीतरी आणि होतो पास कसा बसा."

"कोणबी आजारी झाल तरी आराम करायला जागा हांव  कोठे? लई खस्ता काढल्यात मनेशच्या आयने अन म्या. म्या तुमासनी भेटलाव. तुम्ही ह्यांचो मास्तुर नव्ह का? मी जेवण करायला आलू हाय. तुम्हीभी जेऊन जावायचे. म्या साडीच्या दुकानामंदी करताव. कपडा-साड्या गिराईक लोकासनी दावणे, तो बांधून त्यासनी देणे आणि बाकी माल बरोबर लावणे- संधी माझे काम. "

" सर, शेट त्यांना संडास साफ करायला सांगतात," अकशयच्या बोलण्यावरून त्याला आपले वडील हे काम करतात ते आवडत नाही हे माझ्या लक्षात येते.


"मास्तर, आणि बरे का? ह्यांना बरेच हिंडा- फिरलापण लागते - हे आण ते आण, बिले भरणे, बँकेत पैसे भरणे आणि काढणे. आता माझी हि दोन मुले शिकून मोठी होणार, चांगली कमावणार आणि आम्हाला सुख देणार," मनेशची आई आवंढा गिळीत बोलते, " मनेशला शाळेने स्कॉलरशिप परीक्षेसाठी निवडले आहे."

"शाळा त्याला कशी मदत करते? लागणारी पुस्तके देतात? वेगळी शिकवणी, वगैरे असे काही?"

"काही नाही. दुसरी मुले जे कोणी त्या परीक्षेला बसणार आहेत, त्यांची आणतो पुस्तके आणि त्यांना अभ्यास करण्यास मदतही करतो. हुशार आहे. आमचा छोट्यापण हुशार आहे. तो अभ्यास करून मोठा होणार, होयना पोरा?"

"हो आई!"

"सर, मी आता बरा आहे. I shall come tomorrow. School teachers do not have time to teach anyone of  us for the scholarship examination but our didis (आमच्या संस्थेतील शिक्षिका) help me from time to time. मोठ्या दीदींना (आमच्या मँनेजिंग  ट्रस्टी ) देखील सांगा." 

मी घरातून बाहेर पडतो . बाहेर मला त्यांच्या शेजारचे श्री व सौ शहा (मी त्याची खरी नावे  बदलली आहेत) भेटतात. माझ्याशी ओळख करून घेतात आणि सांगतात की त्या दोघांनी कशी मनेशच्या आई-वडिलांना वारंवार मदत केली, अगदी जागा मिळवून देण्या पासून ते त्यांना तेथे कायम स्वरूपे ठेऊन घेण्या पर्यंत, साऱ्या इतर भाडोत्र्यांचा विरोध आणि राग पत्करून. कसे ते त्यांचा पाठी मागे खंबीरपणे उभे राहिले, वगैरे वगैरे. माझ्या कावळे ओरडू लागल्यात मला लवकर घरी गेले पाहिजे. मी फटाफट जिन्याच्या पायऱ्या, गल्लीतून बाहेर येतो. "टॅक्सी!"

मनेश उत्कृष्टरित्या तिन्ही परीक्षा, आमची,शाळेची आणि सरकारी स्कॉलरशिपची, अशा तिन्ही परीक्षा पास झाला. शाळेत सर्व वर्गातून नेहमी प्रमाणे पहिला आणि आमची परीक्षा ९० % हून अधिक मार्क घेऊन उतीर्ण! (आमच्या संस्थेत १,२, असे क्रमांक दिले जात नाहीत).  ती BMCची  शाळा ७वी पर्यंतच होती. त्या शाळेतील आमच्याकडे  शिकत असलेले इतर विद्यार्थी-विद्यार्थ्यांनीनी आमच्या मार्फत किंवा आप -आपल्या परीने ८वीला दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतले. मनेश प्रवेश मिळविण्याकरिता आमच्या कडे आला नाही. आम्ही त्याची फार प्रतीक्षा केली. पण तो आम्हाला भेटलाच नाही. वाटले मिळालाच असणार त्याला प्रवेश एखाद्या चांगल्या शाळेत, पहिला आला होता ना तो! शाळेतून समजले तो एका उपनगरीय शाळेत शिकतोय, त्याने 'स्कूल लिविंग सरटिफिकेट' घेऊन जाताना तसे शाळेच्या मुख्य अध्यापिकेना सांगितले. तीन वर्ष उलटून गेली

आमच्या जवळच एका शाळेकडून मला निमंत्रण आले. आच्या न्यातीची शाळा - प्रभू सेमिनरी. शाळेचा १०वीचा निकाल १ ० % लागला होता. कार्यक्रम संपला आणि मी बाहेर आलो. "सर, ओळखले नाहीत आम्हाला ? तुम्ही चंदन वाडीच्या  शाळेत _______संस्थेच्या वतीने आम्हाला शिकवीत होतात. मी प्रभू सेमिनारीत होतो, ही पण, हा आर्यन शाळेत, ही आमच्या अगोदर SSC झाली, ही तर तिच्याही पूर्वी. आम्ही सारे चंदन वाडीत शिकलो, सारे तुमचेच विधार्थी. हा आमचा एक ग्रुप आहे, अधून मधून भेटतो - काही चांगले घडते तेंव्हा पार्टी करतो. " मी पाहिले, काहीना मी ओळखले देखील. अझर(फार मस्ती करायचा तो), इम्रान (स्ट्रीट स्मार्ट), सामिया ( उत्कृष्ट मराठी बोलायची), गोविंद (अभ्यासात ठीक), प्रदीप ( मनेश नंतर त्याचा दुसरा नंबर) आणि विलासिनी (जवळपास प्रदीप एवढीच हुशार - थोडे इकडे तिकडे). 
"क्या रे, अझर मनेश तेरे क्लास मे था, बराबर?"
"सर, मनेश माझ्या वर्गात होता,"सामिया सांगत होती, " फार वाईट झाले. त्या सर्वांना काळबादेवीतील घरातून हकलण्यात आले. त्यांच्या शेजारचे शहा का कोणी तरी त्यांच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली."

ह्या सर्व गोष्टींची शहानिशा मी केली नाही. खरे खोटे काय हे मला माहित नाही. समजेल तेंव्हा शहां'चे खरे नाव साऱ्या जगाला सांगून त्यांना सांगीन की ते  किती भोंदू आहेत ते (HYPOCRITES)!


  • काही न पटण्य़ाऱ्या गोष्टी 

कोण एक मुलगा. त्याचे नाव महत्वाचे नाही. अतिशय हुशार! एका कामगाराचा (कंस्ट्रक्शन वर्कर) मुलगा. वडिलाने  आणि इतर साथीदाराने मिळून उभे केले बिग बझार. वडील तेलगु. बिग बझार जवळ असलेल्या एका एनजिच्या हस्तक्षेपा मुळे / मदतीने मिळतो बीमसी शाळेत हिंदी माध्यमात प्रवे. शाळेत आणि त्या संस्थेत शिकू लागतो. संस्थेला त्याच्या हुशारीची आणि गुंणवतेची सुरवातीपासूनच जाणीव होते. त्याच्यावर विशेष लक्ष पुरवले जाते. ० %च्या अधिक मार्क घेऊन तो SSC होतो, चांगल्या प्रकारे ११वी होतो. त्याला नोकरीची गरज असते. संस्थेलाही वाटते की हा एक चांगली 'इन्वेस्टमेंट' आहे पुढे हा संस्थेचा सीईओ बनू शकतो.  शिकता-शिकता संस्थेत काम करू लागतो. घरा साठी त्याला संस्थे कडून कर्ज मिळते. उपकाराचा बोझ वाढत जातो. १२वी, १वी, १४वी पूर्ण करतो. दरम्यान पडेलती कामे करीत रहातो - ऑफीस मधली पाण्याची टाकी भरणे, हातचे काम टाकून ट्रस्टीच्या घरची कामे, नाईलाज होता ना, लोन अंगावर मग काम करणे भागच. हे सारे करून ८० % घेऊन बी कॉ. इच्छा सीए करण्याची. सोडकी बाहेर पड. पण कर्ज आहे डोक्यावर. काय हो, ह्यालाच शोषण (exploitation) म्हणतात ना?

       विनय त्रिलोकेकर

             


No comments:

Post a Comment