Monday 11 June 2018

एक कथा- भावांजलीची


एक कथा- भावांजलीची
मी आजवर अनेक कथा व गोष्टी ऐकल्या असतील. अनेक गोष्टी सांगितल्या असतील. आणि अनेक कथा लिहिल्या असतील. साऱ्या काही संपूर्ण सत्य घटनांवर आधारित नसतील. अनेकदा त्यांत मोठ्या प्रमाणात काल्पनिक भाग असत असे. पण ही गोष्ट एक संपूर्ण सत्य कथा आहे.- मनाला हुरहूर लावणारी कथा.

तो दिवस होता सोमवार  २८ मे , २०१८. होता तो एक काळा दिवस. त्या दिवशी आपल्यातून  निघून गेला ७२ वर्षाचा तरुण, गेला एक दयाळू माणूस, गेली एक परोपकारी व्यक्ती, गेला एक अति विनयशील माणूस, गेला एक आध्यात्मिक पुरुष, गेला एक उमदा व उदात्त प्रभूतरुण , गेला आमच्यातून एक हौशी कलाकार,   गेला एक जाणकार व्यंगचित्रकार आणि त्यांच्या सोबत गेला आमचा मित्र प्रदीप शामराव कोठारे. आणि मिटले एक अष्टपैलू  व्यक्तिमत्व - एक बहुआयामी व्यक्तिमत्व !

खरोखरच आमचा प्रदीप एक 'Multifaceted personality', अर्थात चतुरसत! त्याची धडाडी, काम करण्याचा जोम आणि उत्साह एखाद्या किशोरवयीन मुलांना देखील लाजवील. कोणतेही काम हाती घेतले की ते तडीस नेल्या शियाय तो शांत बसत नसे. ज्ञाती आणि ज्ञाती बाहेरील अनेक संस्थां मध्ये केवळ सहभाग नव्हता तर एक मोठा व महत्वाचा वाटा होता. एव्हडेच नव्हे, काही काही संस्थांचे पुनुरुजीवन करण्यास सहभाग होता. कदाचित विरंगुळा म्हणून तो हौशी रंगभूमीवर  वळला असेल पण अखिल भारतीय आंतरविमा नाट्यस्पर्धेत उत्कृष्ट अभिनयाचे पदक त्यानी पटकावले होते.

 प्रदीप एक जाणकार व्यंग चित्रकार होता. 'कार्टूनिस्ट कम्बाईन 'च्या एक शिबिराच्या प्रदर्शनात प्रदीपची व्यंगचित्र प्रदर्शित झाली होती.   त्याची व्यंग चित्र बोलकी असत आणि 'हसरी रेखा'  द्वारे अनेक   सामाजिक विषय त्यानी चांगल्या प्रकारे हाताळले. त्यांतील मला बरीच आवडलेली पण ही तीन नमूद करतो:

  • दोन विषय एकाच वेळी - स्त्रीभ्रूण हत्या आणि त्यापासून मिळालेले पालकांना नियतीचे फळ, आई - वडीलांची वृद्धाश्रमात  रवानगी : मुलगा मिळवण्या साठी गर्भपात करणे आणि मग तोच मुलगा देतो त्यांना एक प्रकारची शिक्षा - वृद्धाश्रम! 
  • मोफत ग्रंथालय पडते ओसाड व आसाराम बापूंसारख्या भोंदू बाबांच्या आश्रमाकडे रीघ. 
  • महान देशाची स्वच्छता मोहीम -एक बोलके चित्र - पण खाऊन थुंकीची पिचकारी मारणे .
  •  अंधश्रद्धा - एक बोलके चित्र -
 मी रेखाटलेली चित्रं पाहून प्रदीप मला अलीकडेच  म्हणाला होता, "विनय, दिवाळी अंकाकरिता काही कार्टून्स तू काढ. कोणते माध्यम वापरायचे, कोणती शाई, पेन्सिल कोणती , पेपर कोणता ,. हे मी तुला सांगेन. माझ्या घरी ये."
आज येतो - उद्या येतो असे करीत तो योग आलाच नाही. मनात राहिली ती फक्त खंत!

आध्यात्मिकते त्याचा कल जरूर होता. पण तो धार्मिक होता असे मला वाटत नाही. तो कर्म योगी होता, असे मला वाटते. लोकांच्या मदतीस  धावून जाणे हा जणू त्याचा धर्मच होता आणि ते देखील 'out of the way' जाऊन! त्यानीं अनेकांना अनेक प्रकारे मदत केली आहे, मग ते आपल्या ऑफिस मधले कनिष्ठ कर्मचारी असो किंवा वरिष्ठ असो, ज्ञातीतले असोत आगर दुसऱ्या ज्ञातील, शेजारी असो किंवा नातलग, कोणताही भेद भाव न करता त्याच्या मदतीस धावून जाणे हेच एक उद्धिष्ट.

प्रदीप माझा चांगला मित्र होताच पण त्याच बरोबर तो माझ्यातील लेखकासाठी एक मार्गदर्शक - philosopher and guide ठरला. योगायोगाने माझे इंग्रजीतले काही लिखाण (ब्लॉग ) त्याने वाचले. कथेतील लहान-मोठे किस्से  व एकंदरीत  गोष्ट सांगण्याची माझी  लकब तसेच लिखाणाद्वारे वाचकांना व श्रोत्यांना कसे मंत्र मुग्ध करावे ही माझ्यातील सुप्त प्रतिभा (the latent talent in me of narrating anecdotes effectively and holding the audiences and the readers spell bound.)  त्यांनी अचूक ताडली.  आणि त्यानी तसे मला सांगितले देखील.
"विनय, तू चांगले लिहितोस. खरोखर. तू आमच्या प्रभूतरुण साठी तुझ्या गोष्टी मराठीतून लिहिशील का? नाही, तू लिहिणार!" कोणाला अशा प्रकारे लाडीगुडी लावून (coaxing) प्रोत्साहन देणे हे प्रदीपलाच जमायचे.

 मी प्रभूतरुण साठी एक हौशी लेखक (amateur writer ) म्हणून प्रवेश करून आज एक नियमित स्तंभलेखक (regular columnist) झालो. आणि 'तयाचे प्रभूतरुण' आता 'माझे'ही झाले.

 मी माझ्या ह्या कार्टून द्वारे माझ्या मित्रास भावांजली देत आहे.


विनय त्रिलोकेकर



1 comment:

  1. खरोखरच तुम्ही एक चांगले लेखक अहात.

    ReplyDelete